श्रीराम आणि मांसाहारावर ओघात बोललो पण ते खोटं नव्हतं! खेद व्यक्त करतो - जितेंद्र आव्हाड

Jitendra Awad : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राम मांसाहरी होता असं वक्तव्य केलं आहे. त्यानंतर आता भाजप आक्रमक झाली आहे तर अजित पवार गटानेही जितेंद्र आव्हाडांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. 

आकाश नेटके | Updated: Jan 4, 2024, 12:32 PM IST
श्रीराम आणि मांसाहारावर ओघात बोललो पण ते खोटं नव्हतं! खेद व्यक्त करतो - जितेंद्र आव्हाड title=

Jitendra Awad : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटातील नेते जितेंद्र आव्हाड यांनी भगवान राम यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी राम शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता. ते शिकार करून खायचे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं त्यांच्या वक्तव्याबाबत आता भाजप आणि अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. या वक्तव्यामुळे आव्हाडांच्या विरोधात निदर्शने केली जात आहे. याबाबत आता जितेंद्र आव्हाड यांनी खेद व्यक्त केला आहे. माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

"मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचे विकृतीकरण करण्याचे माझं काम नाही. काल मी जे बोललो ते ओघात बोलून गेलो. आमचा पांडुरंग तोच राम आहे. त्या श्रीरामाबद्दल बोलत असताना मी म्हटलं की ते मांसाहारी होते. हा वाद मला वाढवायचा नाही. वाल्मिकी रामायणामध्ये ते लिहीलं असेल आणि त्याच्यावर कुणाचा आक्षेप असेल त्याने ते सांगावे. अन्नपुराणी चित्रपटात वाल्मिकींनी रामायणात लिहीलेला श्लोक म्हणून दाखवला आहे. मी कुठलेही भाष्य अभ्यासाशिवाय केलेले नाही. आजकाल अभ्यासाला नाहीतर भावनांना महत्त्व आहे. माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो," असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

"गुन्हे दाखल करायला काही हरकत नाही मी त्यांना घाबरत नाही. नाशिकचे कोण साधूसंत आहेत? महंत सुधीरदास आहेत का? त्यांनीच कोल्हापूरच्या महाराणींना वैदिक की पौराणिक पूजा करायची त्यात अडकवलं होतं. त्यांच्या बऱ्याच कहाण्या आहेत सांगण्यासारख्या पण मी शांत राहतो. ज्यांच्या डोक्यात आजही वर्ण व्यवस्था बसली आहे त्यांच्याविषयी मी काय बोलणार? मी खेद व्यक्त केला आहे, याचाच अर्थ मला दुःख झालं आहे," असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?

"राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श मानतो आणि मांसाहारी अन्न खातो. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार? मी कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही. मी माझ्या विधानावर ठाम आहे. श्रीरामाला शाकाहारी बनविले जात आहे. पण वनवासात असताना ते काही मेथीची भाजी खात होते का? या देशातील 80 टक्के लोक मांसाहारी असून ते राम भक्त आहेत," असे जितेंद्र आव्हाड यांनी नाशिक येथे बोलताना म्हटलं होतं.