राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाच्या दुस-या टप्प्याला मराठवाड्यातून सुरुवात

आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लोबोल आंदोलनाच्या दुस-या टप्प्याला सुरुवात होत आहे.

Updated: Jan 16, 2018, 03:36 PM IST
राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाच्या दुस-या टप्प्याला मराठवाड्यातून सुरुवात title=

उस्मानाबाद : आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लोबोल आंदोलनाच्या दुस-या टप्प्याला सुरुवात होत आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातून या आंदोलनाला सुरुवात होती आहे. भाजप-शिवसेना सरकारच्या विरोधातल्या राष्ट्वादी काँग्रेसच्या दुसऱ्या टप्प्यातल्या हल्लाबोल आंदोलनाची सुरवात आज तुळजापुरातून होतेय. 

राज्यात रोजगार निर्मिती झाली नाही, राज्यात विकास घडत नाही याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हल्लाबोल आंदोलनाचा दुसरा टप्पा मराठवाड्यापासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत घेत या आंदोलनाची घोषणा केली. 

देवीचा जागरण गोंधळ

पहिल्या दिवशीच सकाळी 9.30 वाजता तुळजाभवानी मंदिरासमोर सरकारच्या विरोधात देवीचा जागरण गोंधळ केला जाणार आहे. 11 वाजता उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. त्यानंतर सभा होणार आहेत. त्याची जोरदार तयारी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे. 

दुसरी सभा उमरग्यात

दरम्यान या सभेनंतर सायंकाळी ४ वाजता उमरग्यात जाहीर सभा होणार आहे. मराठवाड्यात 8 जिल्ह्यात 27 तालुक्यात जवळपास 1800 किलोमीटरचा प्रवास होणार असून 10 दिवसात 27 जाहीर सभा, मोर्चे, भेटी असा कार्यक्रम आहे. 

कोण होणार सहभागी?

यात्रेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार राणा जगजितसिंग यांच्यासह मराठवाडयातले सर्व आमदार, राष्ट्रवादीचे पदाधिकारीही मोठया संख्येने सहभागी होणार आहेत.

मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात हे आंदोलन केले जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ३१ जानेवारीला औरंगाबाद येथे या आंदोलनाचा समारोप होईल.