सुजय विखे-पाटील यांच्याबाबत अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

राष्ट्रवादीने नगरची जागा सोडण्यास नकार दिला. मात्र, यामागचे राजकारण वेगळे होते, हे पुढे आले आहे.  

Updated: Mar 15, 2019, 11:42 PM IST
सुजय विखे-पाटील यांच्याबाबत अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट title=
संग्रहित छाया

पुणे : राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात जागा वाटपावरुन चर्चा सुरु असताना अहमदनगरच्या जागेवरुन वाद आणि तिढा निर्माण झाला. राष्ट्रवादीने नगरची जागा सोडण्यासाठी काँग्रेसचे सुजय यांनी दबावाचे राजकारण सुरु केले. मात्र, राष्ट्रवादीने ही जागा सोडण्यास नकार दिला. मात्र, यामागचे राजकारण वेगळे होते, हे पुढे आले आहे. राष्ट्रवादीने सुजय यांना नगरची ऑफर देऊ केली होती. मात्र, सुजय यांनी ती नाकारली, ही बाब उघड झालेय. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी याबाबत खुलासा करताना हा मोठा गौप्यस्फोट केला. सुजय याने राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढावे, असे त्यांना मी स्वत: सांगितले होते. पण त्यानीच या प्रस्तावाला नकार दिला. त्यामुळे आमचाही नाईलाज झाला, असे पवार म्हणाले.

सुजय यांना राष्ट्रवादीचे तिकीट देऊन निवडून आणण्याची जबाबदारी मी अजित पवार म्हणून स्विकारायला तयार होतो. मात्र, सुजय विखे यांनीच राष्ट्रवादीचा हा प्रस्ताव ठोकरुन दिला. मी सांगतो, सुजयला माझ्यासमोर आणा. हे जर खोटे असेल तर म्हणाल ते करायची माझी तयारी आहे, असे थेट आव्हान त्यांनी दिले. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, की अजित पवार बोलतात ते खरंच बोलतात, असे अजित पवार यांनी आज मीडियाशी बोलताना बारामतीत सांगितले. दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी - काँग्रेसला सर्वत्र अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे या निवडणुकीत आघाडीला निश्चितपणे चांगल्या जागा मिळतील, असा दावा त्यांनी केला.

शरद पवार हे पन्नास वर्षे सक्रीय राजकारणात आहेत. त्यांनी माढा मतदार संघातून माघार घेतली. कारण राज्यसभेची मुदत 2020 पर्यंत आहे. ती जागा विनाकारणच दुसऱ्यांना द्यावी लागली असती. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला असावा. तसेच हवेचा रोख बघून शरद पवारांनी माघार घेतल्याचा आरोप निव्वळ राजकीय हेतूने प्रेरित आहे, असे ते म्हणालेत. दरम्यान, माढ्याच्या जागेबाबत अंतिम निर्णय एका दिवसात होईल आणि सर्वांना मान्य होईल, असाच उमेदवार तेथून दिला जाईल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

पार्थबद्दल बोलायचे झाले तर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार केला गेला आहे. शेकापच्या ज्येष्ठ नेत्यांसह मावळ भागातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही पार्थ पवार यांच्या नावाचा आग्रह धरला होता. त्यामुळे पार्थ पवार यांना उमेदवारी दिली गेली आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.