नवी मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत नाराजी नाट्य दिसून आले. मात्र, या नाट्यावर माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक स्वत: जातीने लक्ष घालून वाद क्षमविण्याचा प्रयत्न केला आहे. गणेश नाईक यांचे धाडके चिरंजीव आमदार संदीप नाईक आणि राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार यांच्यात वादाची ठिणगी पडली. कारण होते नवी मुंबई लावण्यात आलेल्या बॅनरवर जिल्हाध्यक्षांचा फोटो नव्हता. राष्ट्रवादीच्या बॅनरवर जिल्हाध्यक्ष म्हणून आपला फोटो नसल्याचे पाहून अनंत सुतार कमालीचे नाराज झाले. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे वृत्त होते. त्यामुळे राष्ट्रवादी आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली. मात्र, गणेश नाईक यांनी अनंत सुतार यांनी भेट घेऊन समजूत काढली. त्यामुळे राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद थोपविण्यात सध्या तरी यश आले आहे.
नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाढलेल्या नाराजीचा फटका बसणार असल्याने गणेश नाईक यांनी दखल घेत जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांची घरी जावून भेट घेतली. दहावी सराव परीक्षा गेल्या २२ वर्षांपासून राबविणाऱ्या अनंत सुतार यांनाच या उपक्रमाच्या बॅनरबाजीतून वगळल्याने ते नाराज झाले होते. ऐरोली विभागातील ताकदवर नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. तसेच राष्ट्रवादी जिल्हाप्रमुख आहेत. अंतर्गत वाद टोकाला जाऊ नये आणि राष्ट्रवादीला मोठा फटका बसू नये म्हणून अनंत सुतार यांची मनधरणी करण्यासाठी रात्री उशीरा राष्ट्रवादी नेते गणेश नाईक घरी गेले होते. त्यांनी सुतार यांची समजूत काढली. सुताप यांची भेट घेतल्यानंतर गणेश नाईक यांनी आपली प्रतिक्रीया दिली. आपण अनंत सुतार यांची नाराजी दूर केली असून राष्ट्रवादीत आता कोणताही नगरसेवक नाराज नसल्याचे व्यक्तव्य गणेश नाईक यांनी सांगितले.
नवी मुंबई राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाराज, पक्षाला देणार सोडचिठ्ठी?
नवी मुंबई राष्ट्रवादीमध्ये काही वाद असतील तर पक्षातील नाराजांनी थेट कुटुंबप्रमुख म्हणून मला सांगावे, असे आवाहन नाईक यांनी केले आहे. दरम्यान सुतार यांनी नाराजी दूर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी नवी मुंबई शिक्षण संकूलकडून दहावी सराव परीक्षेचा शुभारंभ करण्यात आला. गेल्या १३ वर्षांपासून ही परिक्षा घेतली जात आहे. बोर्डाच्या धर्तीवर होणाऱ्या या परीक्षेसाठी शहरातील मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यमाचे मिळून ९,२०० विद्यार्थी परीक्षा देत आहेत. २५ केंद्रावर ही परिक्षा घेतली जात आहे.