नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, 'या' भागांमध्ये 12 तास पाणीकपात

Navi Mumbai Water Cut: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 8 ऑगस्ट रोजी पाणी पुरवठा होणार नाहीये. नागरिकांनी पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 7, 2023, 07:09 PM IST
नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, 'या' भागांमध्ये 12 तास पाणीकपात title=
Navi Mumbai Water Cut NMMC Announces 12 Hour Water Cut on August 8

Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईच्या पाणीपुरवठ्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. मंगळवारी म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी नवी मुंबईतील काही विभागात पाणीकपात करण्यात येणार आहे. नवी मुंबई महापालिकेने याबाबत घोषणा केली आहे. 8 ऑगस्ट रोजी जवळपास 12 तास नवी मुंबईतील काही परिसरात पाण्याचा पुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यामुळं नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे. 

नवी मुंबई पालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, सानपाडा, वाशी, कौपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या परिसरात पाणी कपात करण्यात येणार आहे. तब्बल 12 तास या भागात पाणीपुरवठा होणार नाहीये. मंगळवारी सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत पाणीपुरवठा खंडित होणार आहे. तर, बुधवारी या भागात  कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशीही माहिती समोर येत आहे. 

नवी मुंबई महानगर पालिकेने मोरबे धरण आणि दिघा दरम्यानच्या मुख्य पुरवठा करणाऱ्या पाइपलाइनचे दुरुस्ती आणि देखभालीचे कामे हाती घेतली आहे. त्यामुळंच मोरबे धरणाजवळील. त्यामुळं भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढील एक दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. 

पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन 

शिवाय, कामोठे आणि खारघरही मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीशी जोडले गेले आहेत. त्यामुळं या विभागांनाही याचा फटका बसू शकतो, अशी माहिती नवी मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसंच, पाणी कपात करण्यात आलेल्या भागातील रहिवाशांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी पुरेसे पाणी साठवून ठेवण्याचा सल्ला दिला आहे आणि शटडाऊन दरम्यान महामंडळाला सहकार्य करावे. दुरुस्तीचे काम पूर्ण होताच पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन पालिकेने दिले आहे. 

मोरबे धरणात पुरेसा पाणीसाठा

दरम्यान, नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण यंदाच्या पावसात 91 टक्के भरले आहे. धरणात पुढील 320 दिवस पुरेल इतका पाणीसाठी झाला असून आणखी 500 मिलीमीटर पाऊस पडल्याने धरण शंभर टक्के भरणार आहे. यंदाच्या मोसमात माथेरानमध्ये 4000 मिमीपेक्षा पाऊस पडला आहे. तर मोरबे धरण क्षेत्रात आतापर्यंत 2741 मिमी पाऊस पडला आहे. मोरबे धरणाची पातळी 88 मीटरपर्यंत पोहोचल्यानंतर 100 टक्के भरते. 

पुण्यातही पाणीकपात

पुण्यातही भरपावसाळ्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. पुणे महानगरपालिकेने शहरातील काही भागात 10 ऑगस्ट रोजी पाणी कपात होणार असल्याची माहिती दिली आहे.