स्वाती नाईक, नवी मुंबई : दिल्ली पाठोपाठ मुंबई (Mumbai) आणि नवी मुंबई (Navi Mumbai) शहरातील वायू प्रदूषणाची समस्या भेडसावत आहे. मुंबईपेक्षा नवी मुंबईमध्ये सूक्ष्म प्रदूषण (Pollution) कणांचे प्रमाण वाढलेत. प्रदूषित कण आणि दूषित वायूमुळे नवी मुंबईकरांचा श्वास कोंडला आहे.
प्लॅन सिटीत राहतो असं वाटणाऱ्या नवी मुंबईकरांनो तुम्हाला कधीही टीबी होऊ शकतो. दमा आणि अस्थम्याचा अॅटॅकही येऊ शकतो. याला कारण आहे नवी मुंबईची प्रदूषित झालेली हवा. गेल्या काही दिवसांत नवी मुंबईतल्या हवेची गुणवत्ता प्रचंड घसरली आहे.
दिल्ली पाठोपाठ नवी मुंबईची हवा प्रदूषित असल्याची धक्कादायक माहिती सफर या संस्थेनं केलेल्या पाहणीत आढळून आली आहे. नवी मुंबईतल्या हवेत ३२१ पार्टिक्युलेट मॅटर एवढे धुलिकणांचं प्रमाण आढळले आहे.
वाहनांमधून बाहेर पडणारा धूर, डोंगर फोडण्याची कामे, नवी बांधकामं, डंपिंग ग्राऊंडवर जळणाऱ्या कचऱ्यामुळे नवी मुंबईचा श्वास गुदमरला आहे. त्यामुळे हवेतील प्रदुषणात वाढ झाली आहे, अशी माहिती सेव्ह मँग्रोव्ह संस्थेचे अध्यक्ष सुकुमार किल्लेदार आणि राजू शिंदे यांनी दिली.
प्रदूषित हवेची मोठी किंमत नवी मुंबईकरांना मोजावी लागेल असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. प्रदुषणामुळे याचा भविष्यात त्रास होण्याची शक्यता आहे, अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञ एन. पी. मिटकरी यांनी दिली.
नवी मुंबईतलं प्रदूषण असेच राहिल्यास स्मार्ट लोकांची स्मार्ट सिटी म्हणण्याऐवजी आजारी लोकांचे आजारी शहर म्हणण्याची वेळ नवी मुंबईकरांवर येऊ शकते.