स्वाती नाईक, झी मीडिया
Navi Mumbai Crime News: नवी मुंबईतील दोघा रिअल इस्टेट एजंटच्या हत्येचे गूढ उकलण्यास अखेर नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. जमीन व्यवहाराच्या वादातून नेरुळमधील दोघा रिअल इस्टेट एजंटची हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आलं असून याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. या दुहेरी हत्याकांडातील फरार असलेल्या एका आरोपीचा शोध सुरु असल्याची माहिती नवी मुंबईचे अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे) दिपक साकोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हत्याकांडामध्ये सहभागी असलेला आरोपी विठ्ठल नाखाडे याने मृत सुमित जैन (39) याच्याशी संगनमत करुन आपला दुसरा सहकारी अमिर खानजादा (42) याची 21 ऑगस्ट रोजी नेरुळ येथे गाडीतच गोळ्या घालून हत्या केली. व त्याचा मृतदेह कर्नाळा येथील अभयारण्यात टाकून दिला होता. अमिरच्या हत्येत आपले नाव येऊ नये व आपला सहभाग आढळून येऊ नये तसेच पोलिसांना गुंगारा देण्यासाठी हत्येत सहभागी झालेला दुसरा इस्टेट एजंट सुमित जैन याने स्वत:च्या पायावर खोपोली येथे गोळी मारुन घेतली होती. मात्र स्वत:ला जखमी करण्याच्या नादात सुमित जैन याच्या शरिरातून मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाला. या दरम्यान हत्येच्या सुपारीचे कबूल केलेले 50 लाख रुपये कधी देणार या वादात मारेकऱ्यांनी सुमित जैनच्या पायावर आणि शरिरावर चाकूने वार केले. यामध्ये सुमित जैन याचा देखील मृत्यू झाला.
दरम्यान, दोन्ही रिअल इस्टेट एजंटच्या मिसिंगची तक्रार 22 ऑगस्ट रोजी नेरुळ पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोघांचा शोध सुरु केला. यादरम्यान पोलिसांना आरोपींची कार खोपोली येथे बेवारस्थितीत आढळुन आली. सदर कारमध्ये पोलिसांना दोन बंदुकीच्या पुंगळ्या आणि रक्ताचे डाग आढळून आल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास अधिक जोमाने सुरु केला. त्यानंतर सुमित जैन या इस्टेट एजंटचा मृतदेह खोपोली-पेण मार्गावरील गागोदे गावाजवळ सापडला
परंतु, अमिर खानजादा याचा थांगपत्ता लागत नसल्यामुळे पोलिसांनी आपली शोध मोहिम अधिक तीव्र करुन या हत्येचा मास्टरमाईंड असलेला आरोपी विठ्ठल नाकाडे (43) याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर विठ्ठल नाकाडे याने सुमित जैन याच्यासह संगनमत करुन अमिर खानजादा याचा काटा काढण्यासाठी 50 लाख रुपयांची सुपारी दिल्याची कबुली पोलिसांना दिली. सदर हत्येचे नियोजन करण्यासाठी सुमित जैन व नाकाडे यांची ठाण्यातील व्हिव्हियाना मॉलमध्ये 20 ऑगस्ट रोजी मिटिंग देखील झाल्याचे त्याने सांगितले.
पोलिसांनी या दुहेरी हत्याकांडात सहभागी असलेले आरोपी जयसिंग मुदलीयार (38) बदलापूर, आनंद क्रूझ (39)नेरुळ, वीरेंद्र कदम (24) कांजुरमार्ग, अंकुश सिताफे (35) उल्हासनगर यांना ताब्यात घेतल्याचे अप्पर पोलीस आयुक्त दिपक साकोरे यांनी सांगितले. मृत सुमित जैन व आरोपी विठ्ठल नाकाडे यांनी पाली येथील एका साडेतीन एकर जमीनीचा सौदा केला होता. सदर जमिनीचा मूळ मालक कोवीडमध्ये मृत झाला असल्याने एका बनावट व्यक्तीला जमीनीचा मालक म्हणून उभा करुन व जमीनीचे खोटे कागदपत्रे बनवून सदर जमीन साडेतीन कोटीला एका व्यक्तीला त्यांनी विकली होती. या बनावट व्यवहाराची माहिती आमिर खानजादा याला समजल्यानंतर त्याने पण या व्यवहारात आपल्याला हिस्सा पाहिजे अशी मागणी जैन व नाकाडे यांच्याकडे केली होती. या व्यवहारात जमीन खरेदीदाराने 60 लाख व 90 लाखाचे दोन चेक सुमित जैन यांच्याकडे दिले होते. त्यापैकी 60 लाखांचा चेक वटल्यानंतर त्या रक्कमेची वाटणी करण्यात आली. मात्र, जमीन खरेदीदाराला या व्यवहारात संशय आल्याने त्याने 90 लाखांच्या चेकचे पेमेंट थांबविले.
सदर माहिती अमिर खानजादा याने दिल्याचा संशय आल्याने सुमित जैन व विठ्ठल नाकाडे यांनी अमिर खानजादाचा काटा काढण्याचे ठरवून त्याला एका जागेच्या व्यवहाराच्या निमित्ताने 21 ऑगस्ट रोजी घेऊन गेले. प्रथमदर्शनी हे हत्याकांड जमीनीच्या व्यवहारातील आर्थिक देवाणघेवाणीवरुन झाले असल्याचे दिसत असले तरी या हत्याकांडाचा पुढील तपास सुरु असून फरार आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती अप्पर पोलिस आयुक्त यांनी दिली.