मुंबई : नवी मुंबईत अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग दिसून येत आहेत. सानपाड्यात मुख्य रस्त्यावरच कचरा फेकण्यात येत होता. याबाबतचे वृत्त '२४ तास डॉट कॉम'ने प्रसिद्ध करताच तात्काळ कचरा उचलण्यात आला आहे. सोमवारी पाऊस झाल्याने रस्त्यावर टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरली होती. रस्त्यावरच ओला - सुखा कचरा आणून टाकला जात होता. परिसरात प्रंचड दुर्गंधीने नागरिकांना नाक मुठीत धरुन जावे लागत होते.
या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. सध्या पाऊस सुरु असल्याने हवेतील संसर्गजन्य आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे परिसरात भीती पसरली आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून दुर्लंक्ष करण्यात येत असल्याने सानपाड्यातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मात्र, २४ तास डॉट कॉमने याबाबचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर पालिकेला जाग आली. तात्काळ संबंधित ठेकेदाराला समज देऊन रस्त्यावरील कचरा उचलण्यास सांगण्यात आले.
दरम्यान, सानपाडा मासळी बाजार येथे गटारावर साठविणाऱ्या बर्फाबाबत ठोस कारवाई पालिका प्रशासनाकडून करण्यात येत नाही. याबाबत 'सेटींग' झाल्याची चर्चा परिसरात आहे.