पनवेलकरांची 12 वर्षांची प्रतीक्षा संपणार, PM मोदींच्या हस्ते 'या' दिवशी मेट्रोचे लोकार्पण; अशी असतील 11 स्थानके

Navi Mumbai Metro:  नवी मुंबईकरांचे (Navi Mumbai) मेट्रोचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. नवरात्रोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) हस्ते मेट्रोचे उद्घाटन केले जाण्याची शक्यता आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 22, 2023, 07:00 AM IST
पनवेलकरांची 12 वर्षांची प्रतीक्षा संपणार, PM मोदींच्या हस्ते 'या' दिवशी मेट्रोचे लोकार्पण; अशी असतील 11 स्थानके title=
Navi Mumbai Metro likely to be inaugurated on October 30 by PM

Navi Mumbai Metro: तब्बल 12 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नव मुंबई मेट्रो लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. बेलापूर ते पेंढारला जोणाऱ्या 11.1 किमी लांबीच्या नवी मुंबई मेट्रो लाइन 1 चे उद्घाटन दसऱ्यानंतर होण्याची शक्यता आहे. 30 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबई मेट्रोचे लोकार्पण होऊ शकते. तर, या पार्श्वभूमीवर ,पंतप्रधानांच्या संभाव्य दौऱयाची नवी मुंबईत लगबग सुरू झाली आहे. 

नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळाला असून येत्या 30 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबई मेट्रोचे लोकार्पण होणार आहे. यावेळी नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या या संभाव्य दौऱ्याची नवी मुंबईत लगबग सुरु झाली आहे.

नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याकरीता एकाच महिन्यात पंतप्रधानांचा तिसरा संभाव्य दौरा नवी मुंबईत आयोजित केला जात आहे. यापूर्वी गत 13 व 14 ऑक्टोबर व त्यानंतर 17 ऑक्टोबरची तारीख नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनासाठी निश्चित केली गेली होती. परंतु, पंतप्रधानांच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे आजतागायत हा योग जुळून आलेला नाही. त्यामुळे येत्या 30 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांचा संभाव्य नवी मुंबई दौरा आखण्यात आला आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनासह नवी मुंबईतील विविध शासकीय प्राधिकरणे पंतप्रधानांच्या संभाव्य दौऱ्याच्या तयारीला लागले आहेत.  

विशेष म्हणजे नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनासह त्याच दिवशी राज्य शासनाद्वारे नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ नवी मुंबईतून केला जाणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेवर आयोजित या नमो महिला सशक्तीकरण अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित महिलांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. या महिला मेळाव्यास संपुर्ण राज्यातून विविध महिला बचत गटातील 1 लाखाहून अधिक महिला उपस्थित राहावेत यासाठी शासन यंत्रणा दिवसरात्र झटत आहेत.  

नवी मुंबई मेट्रो-1 

नवी मुंबई मेट्रो सेवा सुरू होण्यासाठी 12 वर्षांचा कालावधी लागला होती. बेलापूर ते पेंढारपर्यंत मेट्रोला पहिला टप्पा तयार आहे. मेट्रो सुरू करण्यासाठी ऑक्टोबर 2021 मध्ये सीएमआयईएस प्रमाणपत्र मिळाले होते. मात्र विविध कारणांमुळं सेवा सुरू होऊ शकली नव्हती. या मेट्रो लाइनवर एकूण 11 स्थानके आहेत. 

अशी आहेत 11 स्थानके 

बेलापूर, सेक्टर-7 बेलापूर, सायन्स पार्क, उत्सव चौक, सेक्टर 11 खारघर, सेक्टर 14 खारघर, सेन्ट्रल पार्क, पेठा पाडा, सेक्टर 4 खारघर, पंचनंद, पेंढार टर्मिनल अशी 11 स्थानके असणार आहेत. 

असे असेल तिकिट भाडे

मेट्रोकडून प्रवासीभाडेदेखील ठरवण्यात आले आहे. 2 किमीसाठी 10 रुपये, 2 ते 4 किलोमीटरसाठी 15 रुपये भाडे असेल. त्यांनंतप प्रति 2 किलोमीटरसाठी 5 रुपये भाडे वाढवण्याचा प्रस्ताव आहे. 10 किमीपासून पुढे 40 रुपये भाडे असेल. बेलापूर ते  पेंढरपर्यंतचे भाडे 40 रुपये असणार आहे.