Panvel Crime News: पनवेलच्या परदेशी आळीत राहणाऱ्या एका विवाहित तरुणीने आपल्या मानलेल्या भावाला सुपारी देऊन आपल्या आईची हत्या घडवून आणल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणात आई प्रिया नाईक यांची हत्या घडवून आणणाऱ्या प्रणिता तसेच सुपारी घेऊन त्यांची हत्या करणारे विवेक पाटील व निशांत पांडे या तिघांना अटक केली आहे. आईकडून बाहेर फिरण्यासाठी तसेच मोबाईल फोन हाताळण्यासाठी निर्बंध येत असल्याने मुलीनेच वैतागून आपल्या आईची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यां आरोपीमध्ये मृत प्रिया नाईक यांची विवाहित मुलगी प्रणिता, विवेक पाटील आणि निशांत पांडे या तिघांचा समावेश आहे. यातील प्रणिता ही विवाहित असून तिला 5 वर्षाची मुलगी आहे. प्रणिताचे पतीसोबत न पटल्याने ती मागील 2 वर्षभरापासून आपल्या माहेरी पनवेल येथे राहण्यास आहे. या कालावधीत प्रणिताचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध सुद्धा निर्माण झाले होते. मात्र काही कारणामुळे प्रणिताचे प्रेमसंबंध तुटले होते. यादरम्यान प्रणिताची आई प्रिया नाईक हिने प्रणितावर बाहेर येण्याजाण्यावर, फोनवरून बोलण्यावर बंधने घातली होती. प्रणिता बाहेर गेल्यास तिची आई तिला सतत फोन करून विचारणा करत होती. तसेच तिच्या मोबाईल फोनची तपासणी करत होती. आईकडून टाकण्यात येत असलेल्या या बंधनामुळे प्रणितीला काहीच करता येत नव्हते. त्यामुळे ती आईकडून टाकण्यात आलेल्या बंधनाला प्रणिता वैतागली होती.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपी विवेक पाटील हा प्रणिताला बहिण मानत होता. विवेक पाटील याला पैशांची गरज असल्याने त्याने प्रणिताकडे पैशांची मागणी केली होती. प्रणिताला आपल्या आईपासून सुटका करून घ्यायची असल्याने प्रणिता हिने विवेक पाटील याला 10 लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली, मात्र त्याबदल्यात तिने आपल्या आईची हत्या करण्यास विवेक पाटील याला सांगितले. विवेक पाटील याला पैशांची गरज असल्याने त्याने प्रणिताने दिलेली ऑफर स्वीकारली. त्यांनतर त्याने आपला मित्र निशांत पांडे याच्या मदतीने गत 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्रिया नाईक या आपल्या घरामध्ये एकट्याच असताना त्यांच्या घरामध्ये घुसून प्रिया नाईक यांची वायरने गळा आवळून हत्या करून पलायन केले होते.