Navi Mumbai Metro: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ दोन्हीही मेट्रोने जोडले जाणार आहे. यामुळं प्रवाशांचा प्रवास अधिक सोप्पा आणि आरामदायी होणार आहे. विमानतळ एक्स्प्रेस लाइन 35 किमी लांबीची असणार आहे. ज्यातून दररोज 9 लाख नागरिक प्रवास करु शकणार आहेत. तसंच, या प्रकल्पासाठी 15,000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
एमएमआरडीए आणि सिडको या दोन संस्था या प्रकल्पावर काम करणार आहे. मुंबई विमानतळ ते मानखुर्द अशी 11.1 किमी लांबीची मेट्रो लाइन 8 बांधण्यात येणार आहे. तर, सिडको मानखुर्द ते नवी मुंबई विमानतळ या मार्गाचा विस्तार करणार आहे. तसंच, हा मार्ग भुयारी असणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, हा मेट्रो मार्ग मुंबईच्या बाजूने अंशतः भूमिगत असणार असून घाटकोपर येथील अंधेरी ते इस्टर्न एक्स्प्रेस हायवेपर्यंत हा भुयारी मार्ग असणार आहे. घाटकोपर ते मानखुर्द हा लिंक रोडने उन्नत करण्यात येणार आहे. या मेट्रो प्रकल्पामुळं प्रवाशांच्या वेळ वाचणार आहे.
नवी मुंबई विमानतळ प्रकल्प सुरू झाल्यानंतर मुंबई आणि नवी मुंबईदरम्यान वाहतुकीत वाढ होण्याची शक्यता आहे. मेट्रो 8 प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या मार्गामुळं मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ हे अंतर 30 मिनिटांत कापता येणार आहे. तसंच, या मार्गावर 7 स्थानके असणार आहेत. तसंच, या मार्गावर दर 20 ते 30 मिनिटांनी मेट्रो धावेल.
नवी मुंबई विमानतळावर रविवारी दुपारी पहिलं व्यावसायिक विमानाचे यशस्वी लँडिंग झाले आहे. इंडिगो A320 विमान आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्यामुळं पुढील वर्षात नवी मुंबईकरांना हक्काचं विमानतळ मिळणार आहे. तसंच, 17 एप्रिल 2025मध्ये पहिले प्रवासी आणि कार्गो विमान सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा रनवे, सिग्नल यंत्रणा अशी सर्व महत्वाची कामे जवळपास पूर्ण झाल्याची माहिती समोर येत असून विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे.
नवी मुंबई विमानतळामुळं मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी होणार आहे. नवी मुंबईत हे विमानतळ मुंबईपासून 40 किमी अंतरावर असणाऱ्या पनवेलजवळ बांधण्यात आलं आहे. 1,160 हेक्टर परिसरात विमानतळ बांधण्यात आलं आहे. नवी मुंबई विमानतळ जगातील प्रमुख शहरांशी जोडले जाणार आहे. तसंच, नवी मुंबईच्या विमानतळाला मेट्रो, लोकल,बस आणि खासगी वाहनांसोबत जोडण्यात येईल. तसंच, मुंबईवरुन नवी मुंबई विमानतळ गाठण्यासाठी वॉटर टॅक्सीचा विचारही करण्यात येत आहे.