चाय गरम, वडा गरम! पण सावधान... रेल्वे प्रवासात तुम्ही खाताय डर्टी वडापाव

रेल्वे स्टेशनवर विक्री केले जाणारे बटाटेवडे (Vada Pav) बनवण्यासाठी कुठल्या बटाटे वापरले जातात याचा झी 24 तासने लावला शोध

Updated: Jan 14, 2023, 10:35 PM IST
चाय गरम, वडा गरम! पण सावधान... रेल्वे प्रवासात तुम्ही खाताय डर्टी वडापाव title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : वडा पाव (Vada Pav) हा प्रत्येकाच्या आवडीचा खाद्यपदार्थ. कमी पैशात पोटची भूक भागवण्यासाठी वडावाप हा सगळ्यात चांगला पर्याय. पण रेल्वे प्रवासात (Railway Travel) वडापाव खाणार असाल तर सावधान. पण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत धक्कादायक वास्तव. जो वडापाव तुम्ही मनसोक्त ताव मारत खाता, तो कुठल्या बटाट्यांपासून तयार करतात याचा शोध झी 24 तासने लावला  आहे. बटाटा वडा बनवण्यासाठी अतिशय सडके, काळे आणि कुजके असे हे बटाटे (Potatoes) वापरले जातात आणि वड्यामधून थेट तुमच्या पोटात जातायत.

नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या इगतपुरी स्टेशनवर (Igatpuri Railway Station) हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सकाळी जर तुम्ही इगतपुरी स्टेशनवर फेरफटका मारला तर तुम्हाला अनेक ठिकाणी असे सडके बटाटे दिसतील. इगतपुरी स्टेशनवर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात. गाडी थांबल्यावर भूक भागवण्यासाठी हा चटपटीत वडापाव खाल्ला जातो आणि त्यातला सडका बटाटा तुमच्या पोटात जातो. 

तुम्ही खाताय डर्टी वडापाव ? 
मोठ्या चवीने खाल्ले जाणारे बटाटे केवळ इगतपुरीतच नाही प्रत्येक रेल्वे स्टेशनवर कमी जास्त प्रमाणात अशाच पद्धतीने वापरले जातात स्वस्त आणि मोठ्या प्रमाणात खरेदी केलेले हे बटाटे अनेक दिवस पुरवले जातात. इथे तयार होणाऱ्या खाद्यपदार्थासाठी रेल्वेने स्वतंत्र हेल्थ इन्स्पेक्टर (Health Inspector) नेमलेला असतो मात्र त्याचे सुद्धा याकडे दुर्लक्ष असतं. खरंतर अशा विक्रेतांना खुल्या वातावरणात खाद्यपदार्थ विकण्याची परवानगी नाही मात्र असं असताना रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांच्या संगनमताने ही सर्रास विक्री मध्य रेल्वेच्या प्रत्येक स्टेशनवर आपल्याला पाहायला मिळते.... त्यासाठी वापरण्यात येणारे तेल कसं आहे याबाबत सुद्धा अन्न औषध प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

रेल्वेच्या बोगीमध्ये कुठल्याही विक्रेत्याला विकण्याची परवानगी नाही तरीही खाद्यपदार्थांसह इतर विक्रीही सुरुच असते. स्टेशनवर रेल्वे नीर पाणी पंधरा रुपयात विकणं गरजेचं आहे, मात्र यामध्ये कमी फायदा असल्यानं ते विकायलाही टाळाटाळ केली जाते. गुटखा विक्रीला महाराष्ट्रात बंदी असताना रेल्वेत मात्र सर्रास गुटखा विकला जातो

असले सडके बटाटे वापरुन थेट तुमच्या जीवाशीच खेळ केला जातोय. रेल्वे प्रशासन आणि इतर संबंधित यंत्रणा याकडे डोळेझाक करतायत. त्यामुळे तुम्हीच सावध राहा आणि तुम्ही डर्टी वडापाव खात नाही ना, याची खात्री करुन घ्या