पुरोगामी महाराष्ट्रातला अघोरी प्रकार, उकळत्या तेलात हात घालून विवाहितेची परीक्षा

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या या प्रकाराने जातपंचायतीचा जाच सुरूच असल्याचं उघड

Updated: Feb 20, 2021, 08:31 PM IST
पुरोगामी महाराष्ट्रातला अघोरी प्रकार, उकळत्या तेलात हात घालून विवाहितेची परीक्षा title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक: आपलं चारित्र्य शुद्ध आहे, हे सिद्ध करण्यासाठी महिलेला जीवघेणी परीक्षा द्यावी लागल्याची धक्कादायक घटना नाशिकमधून समोर आली आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ देखील समोर आला आहे. एका महिलेला उकळत्या तेलात हात घालून चारित्र्य सिद्ध करण्यास लावण्यात आल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातून समोर आली आहे. 

पारधी समाजातील जात पंचायतीनं हा अघोरी प्रकार केला आहे. या महिलेच्या पतीनं तिच्या चारित्र्यावर संशय घेतला होता. प्रकरण जात पंचायतीपर्यंत गेलं. पंचायतीनं 5 रुपयांचं नाणं उकळत्या तेलातून काढण्याची परीक्षा देण्यास सांगितली. अशा घटनांमध्ये जातपंचायत विचित्र न्यायनिवाडा करून महिलेचे चारित्र्य तपासते. 

यासाठी पतीने तीन दगडांची चूल मांडली. कढई ठेवून त्यामध्ये तेल ओतून उकळ काढली. उकळत्या तेलात 5 रुपयांचं नाणंही टाकलं. उकळत्या तेलातून नाणं बाहेर काढण्यासाठी महिलेला सांगण्यात आलं. ती प्रचंड घाबली आणि तिने नकार दिला. मात्र जात पंचायत आणि पतीनं मात्र माघार घेतली नाही. तिच्यावर असलेल्या प्रचंड दबावामुळे आणि चारित्र्य शुद्ध आहे हे सिद्ध करण्यासाठी नाईलाजानं तिने अखेर उकळत्या तेलात हात घालून तिने नाणं बाहेर काढलं.

अशा अमानुष न्यायनिवाड्याला बळी पडून महिलेने उकळत्या तेलात हात घातला आणि तिचा हात भाजला. नवऱ्यानं या घटनेचा व्हि़डीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या घटनेची चौकशी होऊन जात पंचायत विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल व्हावा  अशी मागणी जात पंचायत मूठमाती अभियानचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केली आहे.

या महिलेचा हात भाजला नाही तर तिचं चारित्र्य शुद्ध, असा अजब न्याय पंचायतीनं लावला होता. महिलेनं अनेकदा विरोध करूनही तिला ही अघोरी परीक्षा द्यायला लावण्यात आली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला.