नाशिक : महापालिकेतल्या राड्याप्रकरणी प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांना अटक झाली आहे. आमदार बच्चू कडू हे नाशिक पालिका आयुक्तांवर धावून गेल्याची घटना पालिकेत घडली आहे. यावेळी आमदार कडून यांनी पालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत मारण्याचा प्रयत्न केला.
मात्र पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी आयुक्तांना बाजूला केल्यानं कृष्णा बचावले. नाशिक पालिकेने १९९५ च्या अपंग पुनर्वसन कायद्यांतर्गत काय अंमलबजावणी केली, अपंगांचा तीन टक्के निधी खर्च करण्याची तरतूद असताना निधी खर्च का झाला नाही, याचा जाब विचारण्यासाठी आमदार बच्चू कडू अपंगांच्या शिष्टमंडळासह पालिकेत आले होते.
यावेळी आयुक्तांच्या कार्यालयात चर्चा सुरु असताना आमदार कडू आणि आयुक्तांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरु झाली. या घटनेनंतर आमदार कडू यांना पोलिसांनी अटक केली आहे. सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर पुन्हा पालिकेत येण्याचा इशारा आमदार कडू यांनी दिला आहे.