नाशिकचं महापौरपद ३० वर्षानंतर खुल्या वर्गासाठी, मोर्चेबांधणीला सुरुवात

नाशिकमध्येही रंगणार पदाचा खेळ?

Updated: Nov 14, 2019, 02:14 PM IST
नाशिकचं महापौरपद ३० वर्षानंतर खुल्या वर्गासाठी, मोर्चेबांधणीला सुरुवात title=

नाशिक : नाशिक महापालिकेतही गेल्या तीन दशकांच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौरपद खुल्या वर्गासाठी खुले झाल्याने अनेकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सध्या भाजपकडे 65, शिवसेनेकडे 34 , राष्ट्रवादी काँग्रेस मधून 12, मनसे आणि इतर मिळून नऊ जागा आहेत, तर दोन पद रिक्त आहेत. त्यामुळे राज्यात रंगलेला खेळ आता नाशिकमध्येही येत्या काळात रंगणार आहे. भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप हे राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेल्यामुळे शिवसेनेचं पारडे जड झाले आहे. त्यामुळे येत्या काळात गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा नाशिकमध्ये पणाला लागणार आहे. 

बुधवारी महापालिकेच्या महापौरपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यामुळे नाशिकचा १६ वा महापौर हा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गाचा असणार आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली आहे. महापौरपदी आता कोणाला बसवायचं याचा प्रश्न सत्तेत असलेल्या भाजपपुढे पडणार आहे. नाशिकच्या विद्यमान महापौर रंजना भानसी यांची मुदत १५ सप्टेंबर रोजी संपणार होता. पण विधानसभा निवडणुकीमुळे त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती. आता त्यांचा कार्यकाल १५ डिसेंबरला संपणार आहे.

नाशिकमध्ये एकूण १२२ नगरसेवक आहेत. त्यापैकी भाजपकडे ६५ नगरसेवकांचे बहुमत आहे. २ नगरसेवकांनी राजीनामा दिल्यामुळे त्या रिक्त आहेत. शिवसेनेचे ३४ नगरसेवक असून शिवसेना विरोधी पक्षात बसली आहे. 

नाशिकमध्ये आता यामुळे महापौरपदासाठी चढाओढ पहायला मिळू शकते. विधानसभा निवडणुकीत अनेक बंडखोर नगरसेवकांना आश्वासन देऊन शांत करण्यात आलं असलं तरी आता नेमकं कोणाला महापौरपद मिळेल हे येणारा काळच ठरवेल.