सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : जलसंपदा विभागात क्लर्क म्हणून कार्यरत असणाऱ्या संतू वायकंडे यांचा मंगळवारी म्हणजे 1 नोव्हेंबरला खून झाला होता. याप्रकरणात पोलिसांनी अवघ्या एका दिवसात आरोपीला अटक (Accused Arrest) केली आहे. काकानेच संतू वायकंडे यांचा खून केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी संशयित काका निवृत्ती हरी कोरडे याला अटक करण्यात आली आहे. संत वायकंडे झोपेत असताना निवृत्ती कोरडे याने मोबाईलच्या चार्जरने (Mobile Charger) गळा आवळून त्यांचा खून केला.
संशयित आरोपी निवृत्ती कोरड हे त्याच्या शेतातील घेवडा विकण्यासाठी नाशिकमधील (Nashik) भाजी मार्केटमध्ये आला होता. उशीर झाल्याने घरी जाण्यासाठी त्यांना कोणतंही वाहन मिळालं नाही. त्यामुळे काका निवृत्ती कोरडे हे मृत संतू वायकंडे याच्या घरी गेले. संतू वायकंडे याची पत्नी दोन मुलांसह माहेरी गेली होती. त्यामुळे काका-पुतण्याने दारू पार्टी केली.
जेवण झाल्यानंतर काका निवृत्ती कोरडे याने संतू वायकंडे यांच्याकडे 3-4 महिन्यांपूर्वी उसने दिलेल्या दोन हजार रुपयांची मागणी केली. यावरुन दोघांमध्ये वाद झाला. वाद निवळल्यानंतर दोघही झोपी गेले. पण काका निवृत्ती कोरडेच्या डोक्यात भलतंच सुरु होतं. दारूच्या नशेत संतू वायकंडे गाढ झोपेत होता. याचा फायदा घेत निवृत्ती कोरडेने मोबाईल चार्जरने संतू वायकंडेचा गळा आवळला. यात संतू वायकंडे यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यानंतर निवृत्ती कोरडे शांत झोपला आणि सकाळ उठून आपल्या मूळ गावी इंदोर (Indore) इथं निघून गेला. सकाळी संतू वायकंडे मृतावस्थेत आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तपास करत अवघ्या एका दिवसात आरोपी निवृत्ती कोरडेला अटक केली.