प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानं चांगलाच वादंग निर्माण झाला आहे. याविरोधात भाजप (BJP) चांगलीच आक्रमक झालीय. नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी भाजपने राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली.
नाना पटोले यांनी एका प्रचार सभा संपल्यानंतर जेवणाळा या गावांमध्ये 'मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर संपूर्ण देशभर वेगवेगळ्या स्तरावरून प्रतिक्रिया उमटल्या.
नेमकं वास्तव काय?
हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाल्यानंतर नाना पटोले यांनी सावध पवित्रा घेत मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोललो नाही तर गावातील गावगुंडा संदर्भात बोललो असल्याचं म्हटलं. झी 24 तासने जेवनाळा गावांमध्ये जाऊन सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्या गावांमध्ये मोदी नावाचा कुठलाही व्यक्ती नाही असं गावातील लोकांनी सांगितलं. नाना पटोले यांच्या वक्तव्यावरून परिसराची बदनामी झाली असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
अशा कोणत्याही गुंडाला अटक नाही
नाना पटोले यांनी नागपूरमध्ये वक्तव्य केलं होतं की मोदी नावाच्या गाव गुंडाला भंडारा पोलिसांनी अटक केली आहे. इतर लोकांची चौकशी सुद्धा पोलिसांकडून केली जात आहे. ज्या लोकांनी तक्रार दाखल केली. त्यांचेही स्टेटमेंट घेण्यात आले आहेत असं पटोले यांनी म्हटलं होतं. मात्र वास्तव काही वेगळचं आहे. पोलिसांनी कुठल्याही मोदी नावाच्या व्यक्तीला अटक केली नाही. पोलिस त्याचा तपास करत आहे. मोदी नावाचा व्यक्ती त्या गावात आहे की नाही हे तपासानंतर जे निष्पन्न होईल असं पोलिसांनी म्हटलं आहे.