Water Cut : पाणी जपून वापरा! अर्ध्या शहरात उद्यापर्यंत पाणीपुरवठा राहणार बंद

Water Cut : सोमवारपासून पुढील 24 तास हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे तसेच दुरुस्तीच्या कारणामुळे टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही

Updated: Nov 21, 2022, 08:58 AM IST
Water Cut : पाणी जपून वापरा! अर्ध्या शहरात उद्यापर्यंत पाणीपुरवठा राहणार बंद title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर (nagpur orange city water) यांनी कन्हान जलशुद्धीकरण केंद्रावरून शहराकडे येणाऱ्या 1300 मीटर, 900 मीटर आणि 600 मीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर उद्भवलेल्या मोठ्या गळत्यांची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचबरोबर कन्हान जलशुद्धीकरण केंद्रात (Kanhan Water Treatment Plant) देखभाल व दुरुस्तीचे काम करण्याकरता 36 तासांचे शटडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे आज 21 नोव्हेंबर (सोमवार) सकाळी 10 ते 22 नोव्हेंबर (मंगळवार) रात्री 10 पर्यंत पाणीपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे.

या दुरुस्तीच्या कामांमुळे लकडगंज, सतरंजीपुरा, नेहरू नगर, आशी नगर झोन्समधील 33 जलकुंभांचा पाणीपुरवठा आज सकाळी 10 ते मंगळवार रात्री 10 पर्यंत संपूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच या शटडाऊन कालावधी दरम्यान टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे अशा सूचना महापालिकेतर्फे देण्यात आल्या आहेत. 

या 36 तासांच्या शटडाऊन दरम्यान कन्हान-1300 मुख्य जलवाहिनीवरील कामठी रोड येथील गळती , कन्हान-900 जलवाहिनीवर जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील गळती , कन्हान-600 जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील गळतीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तसेच 609 मीटर x 600 मीटर जलवाहिनीवर लकडगंज जलकुंभ परिसरातील आंतरजोडणी करण्यात येणार आहे. वाया जाणारे पाणी वाचवण्यासाठी मुख्य जलवाहिनीवर असलेल्या मोठ्या गळत्यांची दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे.

या भागातील पाणीपुरवठा बंद

आशी नगर झोन - बेझनबाग जलकुंभ, बिनाकी 1 व 2 आणि 3 जलकुंभ , इंदोरा 1 व 2 जलकुंभ , गमदूर डायरेक्ट टॅपिंग, 600 मी मी चप्पल कारखाना जलकुंभ , जसवंत टॉकीज डायरेक्ट टॅपिंग आणि उप्पलवाडी (नासुप्र ) जलकुंभ.

सतरंजीपुरा झोन - बस्तरवारी 1, बस्तरवारी 2 आणि बस्तरवारी-3 जलकुंभ , शांती नगर जलकुंभ, वांजरी (विनोबा भावे नगर) जलकुंभ

नेहरू नगर झोन - नंदनवन (जुने) जलकुंभ, नंदनवन 1 व 2 जलकुंभ , सक्करदरा 1, 2 व 3 जलकुंभ , ताजबाग जलकुंभ व खरबी जलकुंभ

लकडगंज झोन - भांडेवाडी, जलकुंभ देशपांडे लेआऊट (भरतवाडा) जलकुंभ , लकडगंज 1 आणि लकडगंज 2 जलकुंभ , मिनिमाता नगर जलकुंभ , सुभान नगर जलकुंभ , कळमना जलकुंभ , बाभुलवन जलकुंभ व पारडी 1 व 2 जलकुंभ