नागपुरात सुट्ट्यांचा फायदा घेऊन चोरांचा सुळसुळाट

नागपूरच्या अजनी पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय शेट्टी गँगच्या तिघांना अटक केली आहे.

Updated: May 13, 2018, 11:35 PM IST
नागपुरात सुट्ट्यांचा फायदा घेऊन चोरांचा सुळसुळाट title=

जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : नागपूरच्या अजनी पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय शेट्टी गँगच्या तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या  आरोपीकडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह ३ दुचाकी जप्त केलेल्या आहेत. शेट्टी गँगने चंद्रपुरात धुमाकूळ घातल्या नंतर ते नागपुरात सक्रिय झाले होते.

विविध कारणांसाठी सपरिवार बाहेर किंवा परगावी जाण्याचा बेत आखात असाल तर त्याची कल्पना शेजारच्यांना द्या, जेणेकरून तुमच्या अनुपस्थितीत ते तुमच्या घराकडे लक्ष देतील. कारण नागपुरात एका शेजाऱ्याने शेजारधर्माचे पालन करत चक्क तीन चोरांना घरफोडी करताना पकडून दिले आहे. अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अभय नगरात राहणारे हर्षल मांजरे सहकुटुंब दिल्ली येथे गेले होते. घराला कुलूप असल्याचे बघून तीन चोरटयांनी रात्रीच्या वेळी त्यांच्या घरात प्रवेश केला.

घरातील सर्व मौल्यवान दागदागिने लंपास करण्यासाठी चोरटयांनी कपाटाचे कुलूप तोडले त्यावेळी झालेल्या आवाजाने शेजाऱ्यांना हर्षल मांजरे यांच्या घरात चोर शिरल्याचा संशय आला. त्याने लागलीच याची सूचना अजनी पोलिसांना दिली.... पोलिसांनी लगेच  घटनास्थळ गाठले आणि चोरी करून पाळण्याच्या बेतात असताना तीन चोरट्याने अटक केली.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रभू सुब्रमण्यम सनीपती, व्यंकटेश कोरवान आणि मुरली उर्फ रोशन किल्लन या आरोपींचा समावेश आहे. तर सुरज नावाचा आरोपी जो ह्या शेट्टी गॅंगचा म्होरक्या आहे तो पळून जाण्यात यशस्वी झाला. शेट्टी टोळीतील सर्व सदस्य हे तामिळनाडूच्या सीमावर्ती भागातील असून ते चोरीच्या उद्देशाने राज्यात विविध भागांमध्ये सक्रिय आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी १० ते १५ दिवसांच्या वर कोणत्याही परिसरात राहत नाही म्हणून ते पोलिसांच्या हाती क्वचितच लागतात. शेट्टी गॅंग वर चंद्रपुरात ३५ पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद आहे. उन्हाळ्यात सहकुटुंब बाहेर फिरायला जाताना किव्हा लग्नसमारंभासाठी बाहेर गावी जाताना पोलिसांनी लोकांना खबरदारी घेण्याचा सल्ला दिलाय.

शेट्टी गँगने काही दिवसांपूर्वी हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी चोरी करून त्याचीच दुचाकी पळवली होती. पोलिसांनी तीन आरोपींकडून चोरीच्या तीन दुचाक्या जप्त केल्या आहेत. पोलीस सध्या टोळीचा मोरक्या सुरजच्या मागावर असून त्याच्या अटके नंतर मोठ्या प्रमाणात चोरीचा मुद्देमाल जप्त होण्याची शक्यता आहे.