एका अपहरणाचा उलगडा करताना 7 चिमुकल्यांच्या अपहरणाचा तपास लागला, आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश झाला

दहा महिन्यांच्या अंतराने पाच वर्षात पाच मुलांना जन्म दिल्याचा आरोपी दाम्पत्याचा दावा, पोलीस घेणार वैद्यकीय चाचणीची मदत  

Updated: Nov 18, 2022, 10:44 PM IST
एका अपहरणाचा उलगडा करताना 7 चिमुकल्यांच्या अपहरणाचा तपास लागला, आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश झाला title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : एका आठ महिन्यांच्या मुलाच्या अपहरणाचा (Kidnapping) उलगडा करताना नागपूर पोलिसांच्या (Nagpur Police) हाती धक्कादायक माहिती लागली आहे. पोलिसांनी एकेक करुन तब्बल सात मुलांच्या अपहरण आणि विक्रीचं प्रकरण उघडकीस आणलं आहे. लहान मुलांचं अपहरण करुन लाखो रुपयांत विक्री करणारी आंतरराज्य टोळीच (Interstate Gang) नागपूरमध्ये सक्रिय असल्याचं या घटनांमधून उघडकीस आलं आहे. 

10 आरोपींना अटक, समाजसेविकाचा समावेश
पोलिसांनी तीन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल तीन प्रकरणात आतापर्यंत 10 आरोपींना अटक केलीय आहे. यापैकी कळमना (Kalmana) प्रकरणी 7 जणांना अटक आहे. यामध्ये 5 बाळांचं अपहरण आणि विक्री झाल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. शांतीनगर पोलीस स्टेशन मध्ये एका चिमुकल्याचं अपहरण आणि विक्री प्रकरण असून यामध्ये राजेश्री सेन या स्वतः ला समाजसेविका म्हणणाऱ्या महिलेला अटक केली आहे.
 
चिमुकल्यांचं अपहरण आणि विक्री
10 नोव्हेंबर रोजी कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीतून जितेश निषाद या चिमूकलच्याचं अपहरण झालं होतं. कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्या योगेंद्र आणि रिटा प्रजापती या दांपत्याने जितेशचं अपहरण केलं आणि अडीच लाख रुपयांमध्ये काही मध्यस्थांच्या माध्यमातून नागपुरातील एका निपुत्रिक कुटुंबाला विकलं.  निषाद दांपत्याने मुलाच्या अपहरणाची तक्रार देताच पोलिसांनी अवघ्या पाच तासात जितेशला सुखरूप आई-वडिलांच्या ताब्यात सुपूर्द केलं. 

हे ही वाचा : T20 World Cup मधील पराभवानंतर BCCI ची मोठी कारवाई, सर्व निवडकर्त्यांची हकालपट्टी

तीन मुलांची विक्री, दोन मुलं विकण्याच्या तयारीत
या प्रकरणी पोलिसांनी प्रजापती दांपत्याकडून मूल घेऊन पुढे विक्रीमध्ये मध्यस्ताची भूमिका निभावणाऱ्या चौघांना अटक केली. मात्र, प्रजापती दांपत्य नागपुरातून पसार झालं. नंतर तीन दिवसांनी दोघांना राजस्थानच्या कोटा मधून ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्या चौकशीत लहान मुलांचं अपहरण आणि विक्रीची धक्कादायक प्रकरणं उघड झाली. प्रजापति दांपत्याने पोलिसांना सांगितले की त्यांनी याच पद्धतीने आणखी तीन मुलांची दीड ते अडीच लाख रुपयांमध्ये विक्री केली आहे. तसंच अटकेच्या वेळी त्यांच्या जवळ असलेली आणखी दोन मुलंही ते विकण्याच्या तयारीत होते. 

पाच वर्षात पाच मुलं जन्मल्याचा दावा
विक्री केलेल्या 3 मुलांसह पाचही मुलं आमची स्वतःची अपत्य असून गेल्या पाच वर्षात प्रत्येकी दहा महिन्याच्या अंतरात ( मार्च 2018 ते फेब्रुवारी 2022 ) मध्ये ही पाच ही मुलं एक एक करून आमच्याकडे जन्माला आली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याची तपासणीसाठी करण्यासाठी पोलिसांनी वैद्यकीय चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली होती, त्यांनी ही आणखी दोन मुलाची अशाच पद्धतीने विक्री केल्याचे तपासात उघड झाल्यानंतर विक्री करण्यात आलेली ही सर्व पाचही बालक वेगवेगळ्या शहरातून नागपुरात आणण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.  

हे ही वाचा : आफताबच्या क्रौर्याचं सोशल मीडियात कौतुक, कोण करतंय श्रद्धाच्या मारेकऱ्याचं समर्थन?

सामाजिक कार्यकर्तीनेच विकलं बाळ
दरम्यान या टोळीशिवाय शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतही अशाच पद्धतीने अवघ्या पाचदिवस पूर्वी जनमलेल्या एका बाळाच्या विक्रीचे प्रकरण समोर आलं आहे. एका गरीब गर्भवती महिलेला आश्रय देऊन तिचे बाळंतपण केल्यानंतर आश्रय देणाऱ्या राजश्री सेन नावाच्या महिला सामाजिक कार्यकर्त्यांनीच या बाळाची विक्री केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

या बाळाला सुमारे दोन लाख रुपयांमध्ये तुळजापूरला विकण्यात आले असून ते बाळही नागपुरात परत आणण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. लहान बाळांचे अपहरण आणि नंतर त्यांची लाखो रुपयांमध्ये विक्रीच्या या तीनही प्रकरणात पोलिसांनी दहा आरोपींना अटक केली आहे.  प्रजापती दाम्पत्य गेल्या काही महिन्यात भंडारा, गोंदिया, नागपूर, बालाघाट, छिंदवाडा सह ज्या ज्या ठिकाणी भाड्यावर राहिले आहे. त्यामुळे या प्रकरणांची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे