दोन मित्रांमध्ये पैज लागली, पुराच्या पाण्यात उडी मारली, पण... पाहा पुढे काय झालं?

दारुच्या नशेत पुराच्या पाण्यात पोहण्याची पैज लागली, दोघांनी पाण्यात उड्या मारल्या आणि...  

Updated: Sep 15, 2022, 08:31 PM IST
दोन मित्रांमध्ये पैज लागली, पुराच्या पाण्यात उडी मारली, पण... पाहा पुढे काय झालं? title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : हिंगणा (Hingana) तालुक्यातील कोतेवाडा इथं वेणा नदीच्या पुरात पोहण्याची शर्यत एका युवकाच्या जीवावर बेतली. यात एका मित्राचा मृत्यू झाला असून दुसरा मित्र मात्र कसाबसा बचावला आहे. दारूच्या नशेत दोन मित्रांनी पोहण्याची शर्यत लावली. यावेळी कोतेवाडा परिसरातील एका पुलावरून मंगळवारी नदी पात्रात उडी घेतली. यात 34 वर्षीय युवकचा मृत्यू झाला. रवींद्र बारापत्रे असे मृत तरुणाचं नाव आहे. तर सुरज चाफेकर असे वाचलेल्या मित्राचं नाव आहे.

दारूच्या नशेत मंगळवारी दुपारच्या दरम्यान रवींद्र मनोहर बारापात्रे आणि त्याच्या मित्र सूरज चाफेकर या दोघांनी वेणा नदीच्या पुराच्या पाण्यात पोहचण्याची शर्यत लावली. त्यांनी दोघांनी कोतेवाडा- गुमगांव दरम्यान असलेल्या पुलावरून वेणा नदीमध्ये उडी घेतली. यात सूरज चाफेकर हा पुलापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या स्मशानभूमीच्या बाजूला पोहत पोहत नदीच्या काठी पोहचला. मात्र रवींद्र बारापात्रे याचा पत्ताच लागला नाही. पाण्याला वेग असल्याने रवींद्र हा नदीच्या पाण्यात पोहून न शकल्याने तो वाहत निघून गेल्याच अंदाज व्यक्त केला जात आहे.

सदरच्या घटनेची माहिती हिंगणा पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक विशाल काळे यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. यावेळी ग्राम पंचायत मध्ये लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो उडी मारताना दिसून आला. मात्र नदीपात्रा बाहेर पडताना दिसला नाही. त्यामुळे कोतेवाडाचे माजी सरपंच रवींद्र आष्ट्णकर यांनी गावातील तरुणांचा मदतीने वेणा नदीच्या काठाने शोधमोहिम राबवत शोध घेतला. पण या भागात जोरदार पाऊस सुरु असल्याने वेणा नदीपत्रात पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आलं.

हिंगणा पोलिसांनी वेणा नदीला पुराचा अंदाज घेत रवींद्र हा दूरवर वाहत गेला असावा असा कयास लावला. संबंधित तरुणाची माहिती पुढील भागातील पोलीस स्टेशनला दिली. यात बुधावरी दुपारी 2 वाजताच्या सुमारास बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेठ देवळी परिसरात एक मृतदेह आढळून आला. यावेळी हा मृतदेह रवींद्रचा असल्याची खात्री करून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून बुट्टीबोरी पोलिसांनी आकस्मिक घटनेची नोंद केली. 

या संदर्भात झी 24 तासकडून हिंगणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्याशी संपर्क करून माहिती घेतली. शवविच्छेदनाचा अहवालात नंतर पुढील करवाई केली जाणार असल्याचं सांगितलं. अद्याप मृतकाच्या कुटुंबियांकडून सुद्धा कुठलीच तक्रार आली नसल्याची माहिती ठाणेदार काळे यांनी दिली.