Nagpur News : नागपुरात बेदरकार ट्रकची 10 हून अधिक वाहनांना धडक; रुग्णवाहिकेचा चेंदामेंदा, अनेकांना गंभीर दुखापत

Nagpur News : नागपुरात बेदरकार ट्रकने मानकापूर कल्पना टॉकीज चौकात दहा पेक्षा जास्त गाड्यांना धडक दिली आणि या भयंकर घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ पाहायला मिळालाय.   

अमर काणे | Updated: Apr 8, 2024, 07:30 AM IST
Nagpur News : नागपुरात बेदरकार ट्रकची 10 हून अधिक वाहनांना धडक; रुग्णवाहिकेचा चेंदामेंदा, अनेकांना गंभीर दुखापत title=
Nagpur news Accident near mankapur truck dashed more than 10 vehicles

अमर काणे, झी मीडिया, नागपूर: (Nagpur Accident News) रविवारी रात्रीच्या सुमारास नागपुरात घडलेल्या एका भीषण अपघातानं तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. नागपुरातील मानकापूर कल्पना टॉकीज चौकात एका बेदरकार ट्रकनं दहा पेक्षा जास्त गाड्यांना धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार या भीषण अपघातात 12 पेक्षा जास्त जण जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीनं नजीकच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु करण्यात आले. दरम्यान ट्रकनं धडक दिलेल्या वाहनांमध्ये एका रुग्णवाहिकेचाही समावेश असून, त्या रुग्णवाहिकेचा या अपघातात चेंदामेंदा झाल्याचं पाहायला मिळालं.

एमएच 34 एबी 7881 क्रमांकाच्या ट्रकचालकाचं मानकापूर उड्डाणपुलावरून उतरताना ट्रक वर असणारं नियंत्रण सुटलं आणि समोर सिग्नलवर थांबलेल्या वाहनांना हा ट्रक जाऊन धडकला. ही धडक इतकी भीषण होती की, काही कार फरफटत पुढे गेल्या... तर काही कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. अपघाताची बाब लक्षात येताच इथं मोठ्या संख्येने नागरिकांची आणि बघ्यांचीही गर्दी गोळा झाली. अपघातानंतर काही काळासाठी कोराडी मार्गावरील वाहतुकही पूर्णपणे विस्कळीत झाली होती. ज्यानंतर वाहतूक विभागाकडून तातडीनं वाहतूक कोंडी मोकळी करण्यासाठीही पावलं उचलण्यात आली.