Nagpur Hit And Run Case: नागपूरमध्ये सीताबर्डी येथे रविवारी मध्यरात्री घडलेल्या हिट अँड रन प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे नागपूरमध्ये दाखल झाल्या आहेत. सुषमा अंधारे आज सकाळी 11 वाजता सीताबर्डी येथील पोलीस स्टेशनला भेट देणार आहेत. नागपूर विमानतळावर पोहोचल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळेंच्या नावावर नोंद असलेल्या कारने भरधाव वेगात पादचाऱ्यांना धडक दिल्याबद्दल अंधारे यांनी खोचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवली. इतकेच नाही तर त्यांनी काँग्रेसचे स्थानिक नेते विकास ठाकरेंनाही टोला लगावला.
रविवारी झालेल्या अपघाताच्या वेळी संकेतने मद्यपान केलेलं नव्हतं असा संदर्भ चंद्रशेख बावनकुळेंनी दिल्याचा उल्लेख करत सुषमा अंधारेंनी खोचक टीका केली आहे. "बावनकुळे, आपण म्हणता संकेत (मद्य) प्यायलेला नव्हता. संकेतचा मित्र (मद्य) प्यायला होता. मग संकेत बारामध्ये दूध प्यायला गेला होता का?" असा खोचक सवाल सुषमा अंधारेंनी विचारला आहे.
"मी सांगितलेला नंबर हा संकेतच्या गाडीचाच आहे. ती गाडी आरटीओने लगेच का पाठवली? गाडी ज्यावेळी टो केली जात होती त्यावेळी नंबर प्लेट का काढली? असे सवाल अंधारे यांनी उपस्थित केले आहेत. "बुंद से गयी वो हौद से नाही आती," असा टोलाही अंधारेंनी बावनकुळेंना लगावला. "आम्ही लक्ष घातल्यानंतर एक एक पुरावे समोर येत आहेत. अजून 2-4 तासांनी संकेत ड्रायव्हिंग सीट वर असेल," असा टोलाही अंधारेंनी लगावला आहे.
नक्की वाचा >> Nagpur Hit & Run: 'कायदा फडणवीसांच्या कोठ्यावर नाचतोय'; 'दोघे मृत्यूशी झुंज देत असताना...'
महायुतीच्या जगावाटपावर प्रश्न विचारला असता सुषमा अंधारेंनी भाजपाला एक खोचक सल्ला दिला. "सध्या भाजपने कुठल्यातरी गृहशांतीची पूजा करण्याची आवश्यकता आहे. ते जे काही करतात त्याच्या विपरीत सगळ्या गोष्टी होत आहेत. काल किरीट सोमय्या यांनी त्यांना घरचा आहेर दिलेला आहे. त्यांनी कोणत्या किती जागा मागावा हा त्या महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे त्यावर मी बोलणार नाही," अंधारे म्हणाल्या.
नक्की वाचा >> बावनकुळेंच्या मुलाला वाचवण्यासाठी काँग्रेसची मदत? ठाकरेंचा उल्लेख करत...
तसेच पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून होणाऱ्या जागांच्या मागणीसंदर्भात विचारलं असता अंधारेंनी, "भाजपा या सगळ्यांना वापरून घेऊन संपवत आहे. यावरून अजित दादांचे प्रवक्ते वारंवार बोलत आहेत. शिंदे गटाचे नेते बोलत आहेत. ज्याला ठेच लागेल तो शहाणा होईल. हळूहळू भाजपा काय चीज आहे हे दोन्ही लोकांना कळेल," असं सूचक विधान केलं.