नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस! अंबाझरीत एका महिलेचा मृत्यू...लष्कर, NDRF, SDRFकडून रेस्क्यू ऑपरेशन

नागपुरात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार उडवला आहे. अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संध्याकाळी नागपुरमधल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. 

अमर काणे | Updated: Sep 23, 2023, 02:18 PM IST
नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस! अंबाझरीत एका महिलेचा मृत्यू...लष्कर, NDRF, SDRFकडून रेस्क्यू ऑपरेशन title=

Nagpur Heavy Rain : नागपुरात मध्यरात्रीपासून पावसानं हाहाकार माजवलाय. मध्यरात्री ढगफुटी सदृश पाऊस (Cloudburst) पडलाय.. मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने (Heavy Rain) शहरात कहर केलाय. कधी नव्हे इतका पाऊस नागपुरात (Nagpur) झालाय. अनेक भागात पावसाचं पाणी घरांमध्येही शिरलंय. मोरभवन बसस्थानकात 12 ते 15 बसेस पावसाच्या पाण्यात अडकल्या होत्या. यात मध्यरात्री हॉल्ट करून थांबलेले चालक वाहक सुद्धा बसमध्ये अडकले होते त्यांची आता सुटका करण्यात आलीय. तर झाशी राणी चौक ते सीताबर्डी मेट्रो इंटरचेंज जाणाऱ्या मार्गावरून चक्क नदी प्रवाहीत होऊन शहरात पाणी शिरलं.

युद्धपातळीवर बचावकार्य
ढगफुटीसारख्या पावसानं उपराजधानी नागपूर जलमय झालीये. नागपूरच्या अंबाझरी (Ambazari) भागातील परिस्थीती हाताबाहेर गेल्यानं इथं मदतकार्यासाठी लष्कराला बोलावण्यात आलंय.. लष्कराची एक तुकडी या भागात दाखल झाली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. रात्री झालेला मुसळधार पाऊस आणि त्यानंतर अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाल्यावर अंबाझरी परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचलंय. वर्मा ले आउट  ,समता ले आउट या भागात 10 ते 15 फूट पाणी साचलंय. या भागात घरांचा पहिला माळा पाण्याखाली गेलाय. तिथे अनेक लोक अडकलेत..घरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलंय

अनेक घरात पाणी
नागपुरातील अंबाझरी भागात घराघरांमध्ये  पाणी शिरलं. अचानक आलेल्या पाण्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत.घरातील सामानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जमिनीपासून पाच फूट पाणी घरात शिरल्याने सर्वत्र चिखल झालेला दिसून येतोय. तसंच घरातील सोफे, खुर्च्या पाण्यावर तरंगत असल्याचंही नागरिकांनी सांगितलं.

मुसळधार पावसानं नागपूर रेल्वे स्थानकावरही पाणी शिरलंय. रेल्वे स्टेशनवरी प्लॉटफॉर्म क्रमांक 1चा भाग पूर्णपणे पाण्यात बुडाला होता.. तिकीट काउंटर परिसर आणि फलाटावर असल्यानं प्रवाश्यांना याचा मोठा फटका बसलाय..पाण्याचा प्रवाह इतका होता की रेल्वे फलाटावर जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी अवस्था झाली होती.

नागपुरात शाळांना सुट्टी
नागपुरात आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. नागपुरात 4 तासांत 106 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. .शहरातील रस्ते जलमय झाल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. त्यामुळे नागपूर शहरातील शाळांना सुट्टी देण्यात आलीय. जिल्ह्यातील शाळांना जिल्हा प्रशासन आणि मनपाकडून सुट्टी जाहीर करण्यात आलीय..

फडणवीसांकडून परिस्थितीचा आढावा
नागपूरतील पूर परिस्थितीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने आढाव घेत आहेत. नागपुरात आतापर्यंत 400 जणांचं स्थलांतर करण्यात आलं असून अडकलेल्यांचं रेस्क्यू करण्याचं काम सुरु असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. तसंच पुरामुळे एक महिलेच मृत्यू झाल्याचंही त्यांनी सांगितलं. संध्याकाळी नागपुरातील पूरपरिस्थितीचा आढावा घेणार असन कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही फडणवीस यांनी केलं आहे. 

विरोधीपक्षांचा आरोप
नागपुरात पाणी साठेपर्यंत प्रशासन झोपलं होतं का? असा संतप्त सवाल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारानी विचारलाय.. हवामान विभागानं यलो अलर्ट दिला असतानाही प्रशासनानं लोकांना का अलर्ट केलं नाही? असा सवालही वडेट्टीवारांनी उपस्थित केला