मुंबई : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र योजनेचा दुसरा टप्पा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. ही योजना नगरविकास विभागाच्या माध्यमातून राबवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नगरपरिषद अध्यक्ष आणि ग्रामपंचायतीचे सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा महत्वाचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय
पेट्रोल डिझेलच्या दरात कपात
आज कॅबिनेटच्या बैठकीत काही लोकहिताचे महत्वाचे निर्णय घेण्यात आले. आजच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत राज्यातील पेट्रोल - डिझेलच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपये प्रति लीटर कमी करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 6 हजार कोटींचा भार पडणार आहे. पेट्रोल - डिझेलचे दर कमी केल्याने राज्यातील मालवाहतूकीचा खर्च कमी होऊन महागाई काही प्रमाणात कमी होणार आहे.