अलिबाग: कोरोनाच्या धास्तीने सध्या मुंबईतील अनेक चाकरमनी आपल्या गावी जाताना दिसत आहेत. परंतु सुरक्षेचा उपाय म्हणून गावकऱ्यांकडून या चाकरमन्यांना काही दिवस क्वांरटाईन केल्यानंतरच गावात प्रवेश दिला जात आहे. गावी आलेल्या या चाकरमन्यांना क्वारंटाईन करण्यासाठी शाळा किंवा ग्रामपंचायतीची कार्यालये उपलब्ध करुन दिली जात आहे. याठिकाणी सुविधांची वानवा असल्यामुळे अनेक चाकरमनी वैतागले आहेत. मात्र, मुंबईतून नागावला जाणारे चाकरमानी मात्र या सगळ्याला अपवाद ठरताना दिसत आहेत. गैरसोय तर सोडाच पण कोरोनामुळे कधी नव्हे ते या चाकरमन्यांना अलिशान कॉटेजेसमध्ये मोफत राहण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे या चाकरमन्यांसाठी 'क्वारंटाईन पिरीयड' म्हणजे एकप्रकारे सुखाची अनुभूती ठरत आहे.
VIDEO : लॉकडाऊनमध्ये अलिबागजवळील चौल गावाचा आदर्श जरुर घ्या
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या भीतीमुळे नागावमधील अनेक चाकरमनी गावी परतत आहेत. मात्र, एकाचवेळी इतक्या मोठ्याप्रमाणावर आलेल्या या लोकांची व्यवस्था कुठे करायची असा प्रश्न नागावमधील गावकऱ्यांना पडला होता. अखेर नागावच्या ग्रामपंचायतीने या सर्वांना पर्यटकांसाठी बांधण्यात आलेल्या कॉटेजेसमध्ये क्वारंटाईन करायचे ठरवले. गावातील कॉटेज मालकांनीही गरज ओळखून यासाठी तयारी दर्शविली. विशेष म्हणजे यासाठी या लोकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
सासरच्या मंडळींनी जावई-लेकीला केलं क्वारंटाईन
ही सर्व कॉटेज पर्यटनाच्यादृष्टीने तयार करण्यात आल्याने याठिकाणी अनेक चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय, खबरदारीचा उपाय म्हणून ही कॉटेजेस नियमितपणे सॅनिटाईज केली जात आहेत. तसेच गावकरी सातत्याने चाकरमान्यांची विचारपूसही करत आहेत. त्यामुळे एरवी गावाबाहेर नकोसा वाटणारा क्वारंटाईन पिरीयड या चाकरमान्यांसाठी सुसह्य झाला आहे.