पत्नीला मधुमेह तरीही सतत मिठाई मागायची; वैतागलेल्या नवऱ्याने तिलाच संपवले

Mumbai News Today: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पत्नीच्या आजारपणाला कंटाळलेल्या एका वृद्धाने तिची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 28, 2023, 11:35 AM IST
पत्नीला मधुमेह तरीही सतत मिठाई मागायची; वैतागलेल्या नवऱ्याने तिलाच संपवले title=
mumbai retired ceo 79 years old killed wife due to diabetes

Mumbai Crime News:  पत्नी सतत मिठाई खायची म्हणून पतीने तिची निर्घृण हत्या केल्याची घटना मुंबईतील कांदिवली परिसरात घडली आहे. समता नगर पोलिसांनी एका ज्येष्ठ नागरिकांला अटक केली आहे. विष्णुकांत बालुर असं या आरोपीचे नाव असून त्याच्या मयत पत्नीचे नाव शकुंतला बालुर असं आहे. शकुंतला बालुर गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. पत्नीची सेवा करुन वैतागलेल्या विष्णुकांत यांनी तिची हत्या केली आहे. 

शकुंतला यांना मधुमेह होत्या तर विष्णुकांत यांनाही गेल्या चाळीस वर्षांपासून मधुमेहाने त्रस्त होते. पत्नीला मधुमेह असतानाही ती सतत मिठाई खायची. डॉक्टरांनी कित्येकदा इशारा दिल्यानंतरही तिने मिठाई खाणे सोडले नाही. शकुंतला यांच्या पतीनेही त्यांना मिठाई खाण्यापासून रोखले होते. मात्र त्या कोणाचेच ऐकत नव्हत्या. पतीने मिठाई दिली नाही की त्या त्यांच्यासोबतही वाद घालत होत्या. 

मिठाई व गोडधोड पदार्थ खाण्यावर नियंत्रण न ठेवल्यामुळं मधुमेह नियंत्रणात येत नव्हता. त्यामुळं विष्णुकांत यांना त्यांची जास्त सेवा व सुश्रुषा करावी लागत होती. पत्नीच्या वागण्याला वैतागलेल्या पतीने  तिचाच काटा काढण्याचा प्रयत्न केला त्यानंतर स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात काम करणारी मोलकरीण जेव्हा बालुर यांच्या घरी पोहोचली तेव्हा त्यांनी पाहिलं की शकुंतला या बेडवर गंभीर जखमी होऊन पडल्या होत्या. तर, विष्णुकांत त्याच बाजूला एका खुर्चीवर बसले होते. समोरचे दृश्य पाहून घाबरलेल्या मोलकरणीने शेजाऱ्यांना माहिती दिली. शेजाऱ्यांनीही लगेचच पोलिसांना याबाबत माहिती दिली. 

आरोपीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, दुपारी शकुंतलाने मिठाई मागितली होती. एकदा मिठाई आणून दिल्यानंतरही तिने आणखी गोड हवं असल्याचा हट्ट धरला. त्यामुळं आरोपीला राग आला. याच रागाच्या भरात त्याने पत्नीवर चाकुने हल्ला केला. इतकंच नव्हे तर, आरोपीने चाकुने स्वतःवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यो जोडप्याचा मुलगा अमेरिकेत राहत असून पोलिसांनी त्याला या घटनेबाबत सूचना दिली आहे. 

विष्णुकांत यांनी शकुंतला यांच्यावर पहाटे तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान डोक्यावर व कानाच्या मागे 9 ते 10 वेळा वार केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एका खासगी कंपनीतील निवृत्त सीईओ आहेत. आरोपी व त्यांची पत्नी दोघंही अनेक वर्षांपासून आजारी होते. व पत्नीची सेवा करण्याला कंटाळले होते.

दरम्यान, पोलिसांना विष्णुकांत रुग्णालयात दाखल केले आहे. त्यानंतर त्यांचे मानसिक आणि शारिरीक आरोग्य पाहूनच त्यांच्या अटकेचा निर्णय घेण्यात येईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे