मुंबई : Mumbai Pune new Deccan Queen : दोन दिवसांपूर्वी डेक्कन क्वीनचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्यात आला. मुंबई आणि पुण्यात वाढदिनी प्रवाशांकडून केक कापण्यात आला. मुंबई-पुणे डेक्कन क्वीन या एक्सप्रेसने 92 वर्षे पूर्ण करत 93 व्या वर्षात पदार्पण केले आहे. आता प्रवाशांचा प्रवास एकदम आरामदायी होणार आहे. कारण मुंबई - पुणे मार्गावर आता नवीन कोरी डेक्कन क्वीन धावणार आहे. मुंबई-पुणे नवीन ‘डेक्कन क्वीन’ 22 जूनपासून सेवेत रुजू होत आहे.
मध्य रेल्वेचे महाव्यस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये एलएचबी डब्यांसह नवीन डेक्कन क्वीन रेल्वेची पाहणी केली. महाव्यवस्थापकांनी सामान्य द्वितीय श्रेणी, एसी चेअर कार, विस्टाडोम कोच, डायनिंग कार आणि किचनची तपासणी केली. 22 जूनपासून एलएचबी डब्यांसह धावणार आहे. नवीन गाडी अधिक सुरक्षित आणि आरामदायी असणार आहे.
डेक्कन क्वीन सर्वांत प्रतिष्ठित रेल्वे आहे. भारतीय रेल्वेवर रेस्टॉरंट कार असणारी ती एकमेव ट्रेन आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (अहमदाबाद) यांनी गाडीची डायनिंग कार आणि बाह्य डिझाईनची रचना रेल्वे बोर्ड, संशोधन, डिझाईन आणि मानक संस्था, इंटिग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई, मध्य रेल्वे यांच्या समन्वयाने केली आहे.
प्रवाशांची मागणी होती की, हायस्पीड रेल्वेसाठी पुणे-मुंबई रेल्वे मार्गाचा विचार करण्यात यावा. तसेच या गाडीला एकूण चोवीस डबे जोडावेत आणि ‘डेक्कन क्वीन’ फलाट क्रमांक पाचऐवजी एकवर आणावी. तर सर्व प्रकारचे सीझन पास आरक्षित करावेत. आता प्रवाशांचा मागणीचा विचार करता नवीन ‘एलएचबी’ डबे असणारी डेक्कन क्वीन धावणार आहे.
नव्या रुपातील डब्यांना आता हिरव्या आणि लाल रंगाचा साज
डायनिंग कारची क्षमता 32 ऐवजी आता 40 प्रवाशांची
पाच रंगांमधील रंगसंगती असलेली ही देशातील एकमेव गाडी
वेग वाढविण्यासाठी ‘एलएचबी’ डबे बसविण्याचा निर्णय
या डब्यांमध्ये प्रशस्त जागा असून ते वजनानेही हलके