एसटी महामंडळाकडून मराठी तरुणांची थट्टा

मोठ्या दिमाखात 'जय महाराष्ट्र' शब्द मिरविणाऱ्या राज्य परिवहन अर्थात एसटीने मराठी तरुणांची कशी थट्टा केली आहे. याचे उदाहरण देणारे धक्कादायक प्रकरण उजेडात आलं आहे.

Updated: Jan 14, 2018, 09:03 PM IST
एसटी महामंडळाकडून मराठी तरुणांची थट्टा  title=

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : मोठ्या दिमाखात 'जय महाराष्ट्र' शब्द मिरविणाऱ्या राज्य परिवहन अर्थात एसटीने मराठी तरुणांची कशी थट्टा केली आहे. याचे उदाहरण देणारे धक्कादायक प्रकरण उजेडात आलं आहे.

एसटीने आपल्या १७३ पदांसाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. मात्र, प्रश्नपत्रिकेतील अक्षम्य चुकांबाबत वारंवार आक्षेप घेऊनही परीक्षार्थींच्या पदरी निराशाच पडलीय. 

राज्य परिवहन महामंडळाने रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली होती. सप्टेंबर महिन्यात याची उमेदवार नोंदणी पार पडली. सहायक वाहतूक अधीक्षक आणि वाहतूक निरीक्षक या २ पदांसाठी केवळ चारच दिवसांची पूर्वसूचना देऊन २९ ऑक्टोबर रोजी ऑनलाईन परीक्षा पार पडली. 

प्रश्नपत्रिकेत किमान ४ प्रश्न चुकीचे असल्याची तक्रार आहे. याची माहिती उमेदवारांनी एसटी प्रशासनाला लगेच ई-मेल द्वारे दिली. मात्र, कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. 

११ जानेवारी रोजी या दोन्ही पदांसाठीचा निकाल अचानक जाहीर करण्यात आला. या निकालात १५० गुणांवर प्राविण्यसुची म्हणजेच कट ऑफ रोखण्यात आली. तसचं एसटी महामंडळाने अभ्यासक्रमात मराठी व्याकरण या विषयाचा समावेश केला. ऑनलाईन परीक्षेत मात्र 'हिंदी व्याकरणाचे' प्रश्न विचारण्यात आले. 

प्रश्नांचा घोळ मराठी, हिंदी आणि गणिताच्या प्रश्नाबाबतही बघायला मिळाला. हा निकाल घेऊन उमेदवारांनी एसटीच्या केंद्रीय कार्यालयाशी संपर्क साधला तेव्हा त्यांना 'हे चालायचेच' असे धक्कादायक उत्तर मिळाले. 

या परीक्षेशी आपला संबंध नसून परीक्षेची जबाबदारी असलेल्या खाजगी कंपनीला विचारा असे संतापजनक उत्तर मिळाले. एसटीने या परीक्षेतून एकूण १७३ उमेदवार निवडले. मात्र, एकाच व्यक्तीची २ पदांवर नियुक्ती केल्याचे उघड झालंय.

नेते मंडळींनी केवळ भावनिक आवाहन करत एसटी चा राजकीय फायद्यासाठी वापरून करुन घेतला. मराठी तरुणांवरील अन्याय कसा दूर करणार याचे उत्तर मात्र सध्यातरी ना एस.टी. जवळ आहे. ना खाजगी कपंनीजवळ.

पोटाला चिमटा घेऊन पदभरतीची प्रतीक्षा करणाऱ्या 'मराठी' तरुणांनी आता 'हिंदीचे व्याकरण' अभ्यासाची गरज आहे.

चंद्रपूर | एसटी महामंडळाच्या परीक्षेत ४ प्रश्न चुकीचे