MPSC Result : अनेकांच्याच महत्वाकांक्षेला बळ देत त्यांची स्वप्न साकार करणाऱ्या काही स्पर्धा परीक्षा कायमच चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरतात. करिअरची अद्वितीय संधी आणि पुढे जाण्याची गौरवास्पद वाट नेमून देणारी अशीच परीक्षा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात येणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा.
नुकताच या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. अधिकृत माहितीनुसार या परीक्षेमध्ये महेश घाटुळेनं प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर, प्रीतम सानप या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर शुभम पवार यानं बाजी मारली असून, मुलींमध्ये वैष्णवी बावस्कर हिनं प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असून, यानंतर आता उत्तीर्ण उमेदवारांना त्यांच्या पदांचे पसंतीक्रम द्यावे लागणार आहेत. विविध न्यायालयात किंवा न्यायधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणांवरील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून ही गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या प्रक्रियेनंतर उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनं पदांचे पसंतीक्रम ऑनलाईन स्वरुपात सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आयोगाच्याच वतीनं अशी माहिती देण्यात आली आहे.
जा.क्र. 121/2023 राज्य सेवा मुख्य परीक्षा-2023 या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.https://t.co/Bg4YnO0CiD pic.twitter.com/heyNjm1sNL
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) September 26, 2024
कधी होणार MPSC ची परीक्षा?
दोन वेळा परीक्षा पुढे ढकलल्यानंतर अखेर यंदाच्या वर्षी 1 डिसेंबर रोजी MPSC महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा जाहीर करण्यात आली आहे. आयोगाच्याच वतीनं ही घोषणा करण्यात आली असून, यामध्ये कृषी सेवेतील 258 पदांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.