भाजप आंदोलनावर अमोल कोल्हे यांची टीका, पाच वर्षांत काय केले?

महाराष्ट्रात भाजपचे आंदोलन सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपवर टीका केली आहे. 

Updated: Feb 25, 2020, 07:04 PM IST
भाजप आंदोलनावर अमोल कोल्हे यांची टीका, पाच वर्षांत काय केले? title=

पिंपरी-चिंचवड : राज्यभर भाजपचे आंदोलन सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी या आंदोलनावर टीका केली आहे. पाच वर्ष सरकारमध्ये असताना आपण काय काम केले, ते पाहावे म्हणजे त्यांना आंदोलन का करतोय याचा संभ्रम होईल, असा टोला त्यांनी लगावला. अमोल कोल्हे यांनी आज पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. दिल्लीतला हिंसाचार अयोग्य आहे पण ही स्तिथी का उद्भवली याचा विचार करणे गरजेचे असल्याचे मतही कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केले. 

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कर्जमाफीच्या नावाखाली विश्वासघात केला असून, शेतकऱ्यांना कवडीचीही मदत मिळणार नाहीय, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. भाजपच्यावतीने आझाद मैदानात आयोजित सरकारविरोधी एल्गार आंदोलनात ते बोलत होते. आम्ही लढू आणि पुन्हा राज्य मिळवू, असं सांगतानाच आम्ही कोणत्याही चौकशीला घाबरत नाही, असंही फडणवीसांनी स्पष्ट केले. सरकारला उद्देशून त्यांनी खास शेरही यावेळी ऐकवला.

दरम्यान, कर्जमाफी देताना शेतकऱ्यांची फसवणूक केल्याबद्दल भाजपच्यावतीने राज्यभरात एल्गार आंदोलन करण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात करण्यात आलेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांबद्दलचा कळवळा कमी आणि राजकारणच जास्त दिसत आहे. धुळ्यातलं भाजपचं हे अनोखं आंदोलन... शेतकऱ्यांच्या जीवाभावाचा नंदीबैल देखील या आंदोलनात सहभागी झाला होता. सरकारनं कर्जमाफी केली का? शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला का? हे सरकार पाच वर्षं टिकेल का? या सगळ्या प्रश्नांना भाजपच्या नंदीबैलानं मान हलवून 'नाही' असंच उत्तर दिलं.. त्यामुळं अर्थातच पाहणाऱ्यांची चांगलीच करमणूक झाली.