विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत बिघाडी?

विधानसभा अध्यक्षपदाची खुर्ची कोणाला मिळणार? राष्ट्रवादी काँग्रेस का नाराज?

Updated: Jul 1, 2021, 05:49 PM IST
विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत बिघाडी? title=
मुंबई: नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या ठिकाणी कोणाची नियुक्ती करायची यावर तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र आता या चर्चेचं रुपांतर वादात होत असल्याचं दिसत आहे. महाविकास आघाडीत विधानसभा अध्यक्षपदावरून वाद निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
 
विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पुणे जिल्ह्यातील भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्यात चुरस सुरू आहे. मात्र शिवसेनेनं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला पसंती दिल्याची माहिती मिळाली आहे. 
 
पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्ष करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस उत्सूक नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दूसरीकडे संग्राम थोपटे विधानसभा अध्यक्ष झाले तर ते आक्रमक असलेल्या विरोधी पक्ष भाजपला कितपत नियंत्रणात ठेवू शकतील याबाबत शिवसेनाही साशंक आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार देणं आता काँग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्नं राहीलेला नाही.
 
पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपद कोणाकडे जाणार हे समजेलच मात्र त्यावरून सुरू असलेल्या वादामुळे आघाडीतील धुसफूस समोर आली आहे. या धुसफूसमुळे आता महाविकासआघाडीत मिठाचा खडा तर पडणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता विधानसबा अध्यक्ष कोण होणार हे पाहाणं सर्वांसाठीच औत्सुक्याचं ठरणार आहे.