शिक्षकांची पात्रता ठरवणाऱ्या परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेतच घोळ

शिक्षक पात्रता परीक्षेतला घोळ  

Updated: Jan 22, 2020, 11:09 AM IST
शिक्षकांची पात्रता ठरवणाऱ्या परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेतच घोळ  title=

अरुण मेहेत्रे, झी २४ तास, पुणे : शिक्षकांची पात्रता ठरवणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिकाच जर असंख्य चुकांनी भरलेली असेल तर त्याला काय म्हणायचं. टी ई टी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत हाच प्रकार मोठ्या प्रमाणात आढळून आला. जेणेकरुन भावी शिक्षकांनाच डोक्यावर हात मारुन घ्यायची वेळ आली. 

शिक्षक पात्रता परीक्षेतला घोळ
तिसऱ्या ऐवजी निसऱ्या
झपाट्याने ऐवजी झपय्याने
ठिकाणी ऐवजी ढिकाणी
बेशुद्ध ऐवजी वेशुद्ध

इतक्या सगळ्या चुका पाहून परीक्षेला बसलेल्या भावी शिक्षकांवर बेशुद्ध पडायची वेळ आली असेल.... पेपर २ ची प्रश्नपत्रिका बत्तीस पानांची होती. त्या प्रश्नपत्रिकेतील केवळ तीन पानांमध्येच तब्बल १०५ चुका आढळून आल्या. यातील बहुतांश चुका शुद्धलेखनाच्या आहेत.

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत TET परीक्षा घेतली जाते. तज्ज्ञांकडून तपासणी झाल्यानंतरच प्रश्नपत्रिका छापली जाते. असं असतानाही इतकी गंभीर चूक कशी झाली याची चौकशी करण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिकेतील चुकांसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे गुणदानाबाबत योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे. असं असलं तरी यानिमित्ताने परीक्षा परिषदेच्या कारभाराची लक्तरं पुन्हा एकदा पाहायला मिळाली.