पुणे : पुण्यात लष्कराच्या कमांड हॉस्पिटलच्या प्रांगणात संशयीतरित्या फिरणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलंय. या व्यक्तीला वानवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. शेजारीच असलेल्या आर्म्ड फोर्सेस मेडीकल कॉलेजचा गणवेश घालून हा व्यक्ती फिरत होता. लष्कराच्या जवानांना संशय आल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेतलं. सईद जुनेद सईद अख्तर असं या तरुणाचं नाव आहे. त्याच्याकडे काही बनावट कागदपत्र आणि एएफएमसीचं ओळखपत्र सापडलं आहे. या व्यक्तीकडे बनावट कागदपत्रांसह काही वस्तूही सापडल्या आहेत.
उल्लेखनीय म्हणजे, कमांड हॉस्पिटल आणि एएफएमसी शेजारी शेजारीच आहे. एएफएमसीचे विद्यार्थी कमांड हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रॅक्टीस करतात.
हा तरुण मूळचा बुलडाण्याचा असल्याची माहिती हाती येतेय. त्यानं एएफएमसीमध्ये प्रवेश मिळाल्याचं आईला खोटंच सांगितलं होतं. कॉलेजच्या पार्श्वभूमीवर फोटो काढण्यासाठी कॉलेजचा गणवेश परिधान करून फोटो काढण्यासाठी आलो होतो, असं स्पष्टीकरण त्यानं पोलिसांना दिल्याचंही समजतंय.