Mhada Homes : स्वत:च्या घराचं स्वप्न अनेकजण पाहतात. याच घरांसाठी कैक मंडळी फार आधीपासूनच प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसता. अखेर जेव्हा हे घराचं स्वप्न साकार होतं तेव्हा होणारा आनंद गगनात मावेनासा असतो. अशा या हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी, कारण आता म्हाडाचा आणखी एक प्रकल्प तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी हातभार लावणार आहे.
संभाजीनगरच्या ऑरिक सिटीमध्ये म्हाडाचा तब्बल 4500 घरांचा प्रकल्प भा राहणार असून त्यासाठीचा प्रस्ताव मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांपुढं सादर केला जाणार असल्याची माहिती अतुल सावे यांनी दिली.
शेंद्रा औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या ऑरिक सिटी येथे म्हाडाचा अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठीचा हा प्रकल्प प्रस्तावित असून, नागरिकांसाठी साडेचार हजार घरं बांधण्याचा मानस ठेवण्यात आला आहे. म्हाडाच्या या प्रकल्पामध्ये वीज, पाणी, रस्ते आणि ड्रेनेज अशा पायाभूत सुविधा तयार असल्यामुळं कामगार वसाहतीसाठी हा प्रकल्प म्हाडाला फायद्याचा असेल असं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, सध्या प्रस्तावित जागेच्या दरासंबंधीची चर्चा सुरू असल्याची माहिती देण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबतच्या बैठकीनंतर सदर प्रकल्पाचा प्रस्ताव मार्गी लावण्यात येईल अशी माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी एका माध्यमसमूहाशी संवाद साधताना दिली.
ऑरिक सिटीमध्ये नागरी वसाहतींसाठी विकसित जमीन असल्यामुळं म्हाडाकडून संबंधित 7.50 हेक्टर जमीन विकत घेण्यात येईल. ज्यानंतर अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील कामगारांसाठी इथं एक Smart City उभारण्यात येईल. या धर्तीवर म्हाडाच्या वतीने शासनाशी पत्रव्यवहार झाल्याची माहितीही समोर येत आहे.
म्हाडाच्या या प्रकल्पाचा अनेकांनाच फायदा होऊन आता येत्या काळात अनेकांनाच होताना दिसणार आहे. फक्त संभाजीगरच नव्हे, तर इथं शहरी भागांमध्येसुद्धा म्हाडाच्या अनेक प्रकल्पांनी अनेकांच्याच स्वत:च्या घराचं स्वप्न साकार केलं आहे. येत्या काळात आता याच म्हाडाकडून नेमकी कोणत्या भागात सोडत निघते आणि यामध्ये कोणा भाग्यवंतांचं नशीब फळफळतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.