Maharashtra Teacher Recruitment : राज्यात लवकरच पहिल्याच टप्प्यात शिक्षक भरती करण्यात येणार आहे. राज्यात हजारो शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार शिक्षक भरती करणार आहे. नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत (maharashtra winter session) लक्षवेधीला उत्तर देताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (deepak kesarkar) यांनी ही घोषणा केली आहे. शिक्षकांच्या रिक्त जागांवार भरतीचा तोडगा काढला जात आहे. काय म्हणाले दीपक केसरकर?
50 टक्के भरती ही ताबडतोब
"50 टक्के शिक्षक भरती लवकरच केली जाणार आहे. 80 टक्के भरती करता आली असली, पण आधारकार्ड लिंक सुरु असल्याने विद्यार्थ्यांची निश्चित संख्या ठरल्यानंतर 30 टक्के भरती होईल. तसेच परवानगी मिळाली तर 100 टक्के भरती करण्याची तयारी शिक्षण विभागाची आहे. डिसेंबर 31 पर्यंत आधार लिंक करण्याचे काम होईल आणि त्यानंतर एक महिन्याने सर्व कामांचा मेळ घेतला जाईल, पण भरती न थांबवता 50 टक्के भरती ही ताबडतोब केली जाईल. यात शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती होईल," अशी घोषणा दीपक केसरकरांनी केली. यावेळी 30 हजार प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याचे दीपक केसरकरांनी सांगितले.
याआधी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सप्टेंबरमध्ये राज्यात शिक्षक भरतीची घोषणा केली होती. "राज्यात 75 हजारांहून अधिक शिक्षकांच्या पदांची भरती करू. ही केवळ घोषणा नाही, तर प्रत्यक्षात बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याचं काम करणार आहे," असे दीपक केसरकर यांनी म्हटले होते.
0 ते 20 पदसंख्या असलेली एकही शाळा बंद होणार नाही - दीपक केसरकर
कॉंग्रेस आमदारांनी शाळांच्या पटसंख्येवरुन शाळा बंद करण्यात आल्यावरुन राज्य सरकारवर टीका केली. यावेळी दीपक केसरकर यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. 0 ते 20 पदसंख्या असलेली एकही शाळा बंद होणार नाही, असे आश्वासन दीपक केसरकर यांनी दिलं आहे.