पुणे : सोवळ्याच्या वादप्रकरणावर झालेल्या टीकेनंतर हवामान विभागाच्या माजी संचालिका मेधा खोले यांनी अखेर आपली फिर्याद मागे घेतली आहे. सिंहगड पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे.
निर्मला यादव या महिलेवर मेधा खोले यांनी जात लपवल्याचा आरोप करत, त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. ही तक्रार खोलेंनी मागे घेतलीये.
२०१६मध्ये निर्मला कुलकर्णी नवाची महिला त्यांच्याकडे आली. कामाची गरज असल्याचं सांगत त्यांनी खोले यांच्याकडे स्वयंपाकाचं काम मागितलं. त्यावेळी मेधा खोले यांनी तिच्या घरी जाऊन ती ब्राम्हण आहे का याची पडताळणी केली आणि तिला स्वयंपाकाचं काम दिलं. नुकत्याच पार पडलेल्या गौरी-गणपतीतही निर्मला हिने मेधा खोले यांच्या घरी सोवळ्यातील नैवेद्याचा स्वयंपाक केला.
मात्र बुधवारी मेधा खोले यांना निर्मला ही ब्राम्हण नसल्याची माहिती मिळाली. मेधा खोले यांनी या संदर्भात माहिती घेतली असता निर्मला हिचं खरं नाव निर्मला कुलकर्णी नसून निर्मला यादव असल्याचे निष्पन्न झाले. यावरुन दोघींमध्ये वाद झाला. यावेळी निर्मला हिने आपल्याला शिवीगाळ केली आणि धमकावल्याची तक्रार मेधा खोले यांनी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती.