मराठा आरक्षण: चाकणमध्ये तणावपूर्ण शांतता; बससेवा ठप्प

चाकण परिसरातल्या काही शाळा आणि कॉलेजला आज सुट्टी देण्यात आलीय. तर अनेक पालकांनी मुलांना शाळेत न पाठवणं पसंत केलंय.

Updated: Jul 31, 2018, 10:02 AM IST
मराठा आरक्षण: चाकणमध्ये तणावपूर्ण शांतता; बससेवा ठप्प title=

पुणे: चाकणमध्ये आज (मंगळवार, ३१ जुलै) सकाळी तणावपूर्ण शांतता आहे. चाकणमध्ये जाणारी एसटी सेवा बंद आहे. सकाळपासून पीएमपीएमएलची बससेवाही ठप्प आहे. काल (सोमवार, ३० जुलै) चाकणमध्ये १२ ते १५ बसेस फोडण्यात आल्या. चाकण परिसरातल्या काही शाळा आणि कॉलेजला आज सुट्टी देण्यात आलीय. तर अनेक पालकांनी मुलांना शाळेत न पाठवणं पसंत केलंय.

पोलिसही जखमी

राजगुरूनगर आणि चाकणला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. बसस्टॉपवर मोठी गर्दी झालीय. दरम्यान काल झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या चाकणचे पोलीस निरीक्षक चौधरींचा कार्यभार आता तळेगावचे पोलीस निरीक्षकांकडे सोपवण्यात आलाय. पोलीस कॉन्स्टेबल अजय भापकर गंभीर जखमी आहेत. पोलीस उपअधीक्षक गणपतराव माडगुळकर, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे हे देखील कालच्या हिंसाचारात जखमी आहेत.

सीसीटीव्हीच्या अधारे तपास सुरू

दरम्यान, परिसर आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस प्रयत्नशिल आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, व्हाट्सअॅप आणि इतर सोशल मीडियावर पाठवले गेलेले संदेश यांच्या अधारे तपास सुरू केला आहे.