मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटीत ड्रोनच्या घिरट्या, कोण करतंय टेहळणी?

Manoj Jarange : अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचा मुक्काम असलेल्या घरावर ड्रोननं टेहळणी केल्याचा आरोप केला जात असून याबाबत गावकऱ्यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. तर जरांगेंना संरक्षण देण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

राजीव कासले | Updated: Jul 2, 2024, 03:31 PM IST
मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटीत ड्रोनच्या घिरट्या, कोण करतंय टेहळणी? title=

मुंबई : अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे-पाटील यांच्या घराजवळ ड्रोन फिरत (Drone Surveillance) आहेत. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण आंदोलन हाताळ्याची ही कुठली पद्धत आहे असा सवाल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. अंतरवाली सराटीमध्ये ड्रोन फिरत असल्याने गावात भीतीचे वातावण निर्माण झालं आहे. त्यामुळे सरकारने याबाबत निवेदन करून मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांना सरकारने अधिकचे पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधासभेत केली.

गावावर ड्रोनने टेहळणी
अंतरवली सराटी या गावावर ड्रोनने टेहळणी केल्याचं वृत्त आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेला धोका आहे. टेहाळणी प्रकार होत असेल तर कोण करते, कशामुळे टेहळणी केली जात आहे? आंदोलन करणे प्रत्येकाचा अधिकार आहे. हा अधिकार संविधानाने दिला आहे. अंतरवाली सराटीतील रहिवाशी भयभीत झाले आहेत. याकडे सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे. जरांगे-पाटील यांना संरक्षण द्या, ड्रोन कोण फिरवते आहे, याचे सविस्तर निवेदन सरकारने करण्याची सूचना विजय वडेट्टीवार यांनी केली. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांनी पोलीसांकडून अहवाल घेणार असल्याचं सांगितलं.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी गावात केलेल्या आमरण उपोषण आंदोलन स्थळाची आणि जरांगे राहत असलेल्या अंतरवाली सराटी या गावच्या सरपंचांच्या घराची अज्ञात ड्रोनच्या साह्याने टेहाळणी केल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. गावकऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे.काल रात्री हा प्रकार समोर आला आहे अंतरवालीच्या सरपंच कौशल्याबाई तारख यांच्या घर परिसरात आणि गावात मध्यरात्री ड्रोन फिरल्याची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील अंतरवालीतील याच सरपंचांच्या घरी अधून मधून मुक्कामाला असतात. याच घराभोवती तसेच परीसरात अज्ञात ड्रोनने रात्रीच्या सुमारास घिरट्या घातल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सहा तारखेपासून संवाद दौरा
मनोज जरांगे पाटील हे 6 जुलै पासून मराठवाड्यात सवांद दौरा करणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात हिंगोली इथून होणार आहे, जरांगे पाटलांची 100 एकर मध्ये हिंगोलीत भव्य सभा पार पडली होती, त्यामुळे जरांगे पाटील हिंगोली पासून आपल्या सवांद रॅलीला सुरुवात करणार आहेत, या रॅलीची भव्य दिव्य तयारी मागील दहा दिवसांपासून हिंगोलीत सुरू झाली असून जिल्हा स्तरावरील बैठकी नंतर तालुक्याच्या बैठका पार पडल्या, आता गावस्तरावर मराठा समाजाच्या वतीने बैठका घेतल्या जात असून जरांगेच्या सवांद रॅलीला येण्यासाठी आवाहन केलं जात आहे, ऐन पावसात आणि रात्री उशिरा पर्यंत ह्या बैठका सुरू आहेत, लाखोंचा जनसमुदाय जरांगे पाटलांच्या रॅलीला यावा यासाठी मराठा समाजाचे स्वयंसेवक मोठी मेहनत घेतांना बघायला मिळत आहेत.