विशाल वैद्य, कल्याण : ही बातमी आहे डोबिंवलीच्या लखोबा लोखंडेची. या महाभागानं एक-दोन नव्हे, तर सात-सात बायकांशी लग्न केले. विशेष म्हणजे त्याच्या एका पत्नीनंच त्याचे हे प्रताप उघड केलेत.. कोण आहे हा महाभाग, चला पाहूयात हा खास रिपोर्ट...
तीन बायका आणि फजिती ऐका. असं म्हणायची वेळ मकरंद अनासपुरेवर सिनेमात आली होती. पण डोंबिवलीच्या एका पठ्ठ्यानं मकरंदलाही मागे टाकलंय. त्यानं एक दोन नव्हे, तर चक्क सात बायकांशी विवाह केलाय. त्या महाभागाचं नाव आहे सूर्यकांत कदम.
धक्कादायक बाब म्हणजे डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात तो कामाला होता. बायको सुचिता (नाव बदलेले आहे) हिच्यासोबत तो कल्याणच्या चिंचपाडा भागातल्या बालाजी पॅराडाईज इमारतीत राहत होता.
सुचिताचा 1992 मध्ये सूर्यकांतसोबत विवाह झाला होता.
त्याआधी 1986 मध्ये प्राची (नाव बदलेले आहे) नावाच्या महिलेशी त्याचं लग्न झालं होतं.
1993 मध्ये काईबाई (नाव बदलेले आहे)
1995 मध्ये राजश्री (नाव बदलेले आहे)
1998 मध्ये हेमा (नाव बदलेले आहे),
2007 मध्ये धनश्री (नाव बदलेले आहे)
आणि 2014 मध्ये सविता (नाव बदलेले आहे) नावाच्या महिलेसोबत त्यानं लग्न केलं. यापैकी दोघींचे निधन झालंय. तर उर्वरित पाच बायका हयात आहेत.
अंबरनाथला दवाखान्यात नर्सचं काम करणाऱ्या सुचिताने आपल्याच नवऱ्याची पोलखोल केली. या आधुनिक 'लखोबा लोखंडे'नं आपल्या जाळ्यात ओढलेल्या सातही बायका नोकरी करणाऱ्या होत्या. याबाबत सुचितानं कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त संजय शिंदे यांच्याकडे तक्रार केली. त्याची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्तांनी कदमला निलंबित केलंय.
सात बायका करणा-या सूर्यकांतला चांगली अद्दल घडलीय. रक्षणकर्ता पोलीसच सातजणींच्या आयुष्याशी कसा खेळ खेळत होता, हे यातून समोर आलंय. त्याला निलंबित केलं असलं तरी त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा कधी दाखल होणार, असा सवाल आता केला जातोय.