मनोज जरांगेचं आता 'मिशन विधानसभा' 'इतके' आमदार निवडून आणण्याच्या निर्धार

Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करून पुढच्या राजकीय लढाईची घोषणा केलीय. आरक्षणाच्या मुद्द्यावरून आधीच अडचणीत असलेलं सरकार आणि जरांगे पाटील यांनी जाहीर केलेलं 'मिशन विधानसभा' यामुळं सरकारची डोकेदुखी वाढवण्याची शक्यता आहे.

राजीव कासले | Updated: Jul 24, 2024, 07:43 PM IST
मनोज जरांगेचं आता 'मिशन विधानसभा'  'इतके' आमदार निवडून आणण्याच्या निर्धार title=

विशाल करोळे, झी मीडिया, संभाजी नगर :  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी आपलं 5 दिवसांचं उपोषण स्थगित करून राजकीय आखाड्यात उतरण्याची घोषणा केलीय. अंतरवालीतून जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) विधानसभेचं रणशिंग फुंकलंय. सरकारचा जीव ज्या खुर्चीत आहे ती खुर्ची मिळवण्याच्या तयारीत आम्ही लागू असा इशारा जरांगेंनी दिलाय. विधानसभेत (Assembly Election) 30 ते 40 आमदार पाठवण्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला. जरांगे पाटलांनी विधानसभा रिंगणात उतरण्याची घोषणा केल्यानंतर राजकीय पक्षांचं टेंशन वाढलं असणार हे नक्की आहे.. कारण लोकसभेत सत्ताधारी भाजपला मराठा आंदोलनाचा फटका बसल्याचं दिसून आलं..

मनोज जरांगे पाटलांचं ठरलं
जरांगे पाटील यांचा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निश्चय केलाय.  40 आमदार निवडून आणण्याचा निर्धार त्यांनी केलाय.  विधानसभेला जरांगे किती उमेदवार देणार? जरांगे पाटील यांनी कोणत्या मतदारसंघांची चाचपणी केलीय? लोकसभेला मराठवाड्यात चाललेला जरांगे फॅक्टर विधानसभेला राज्यभरात चालेल का? जरांगेंच्या मिशन विधानसभेचा फटका कुणाला बसेल? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतायत मिशन विधानसभेची घोषणा करताना जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanvis) पुन्हा एकदा तिखट शब्दात निशाणा साधला. तर भाजपनंही जरांगेंवर जोरदार पलटवार केला.

देवेंद्र फडणवीस कायमचे राजकारणातून संपले पाहिजेत अशी भावना, मनोज जरांगे यांनी बोलून दाखवली. त्यावर प्रत्युत्तर देताना, फडणवीसांनी दिलेलं आरक्षण तुम्हाला मान्य नाही का? असा सवाल प्रसाद लाड यांनी केलाय. तुमच्यावर कुणी गुन्हा दाखल केला तर त्यातही फडणवीसांचा दाखला देत असाल तर ते बोलणं योग्य नाही असं त्यांनी म्हटलंय.

मनोज जरांगेंनी भाजप नेते प्रवीण दरेकरांवरही निशाणा साधलाय. 5 ते 7 जणं भाजपला लागलेली कीड असून दरेकरांमुळे भाजपला फटका बसणार असल्याचं जरांगेंनी म्हटलंय. तसंच दरेकरांनी आपल्या नादी लागू नये असा इशारा त्यांनी दिलाय

दरम्यान, जरांगे निवडणूक लढवू शकत नाहीत हे बाँडवर लिहून देतो असा दावा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केलाय. तर अजय बारस्करांनीही जरांगेंवर गंभीर आरोप केलेत. जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत उपोषण आणि आंदोलनाचा मार्ग स्विकारला होता. आता त्यांनी आता थेट राजकीय आखाड्यात उतरण्याचा निर्धार केल्यानं विधानसभेची समिकरणं बदलणार आहे.. जरांगेंची राजकीय भूमिका मराठा समाजाला रुचणार का हा मुद्दाही तितकाच महत्वाचा असणाराय...