नाशिक : शहरातील बँक एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील मध्यवर्ती भागातील पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम फोडल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे एटीएम फोडताना संशयिताला रंगेहाथ पकडण्यात पोलीस बिट मार्शल यांना यश आलं. याशिवाय कुठलीही रक्कम यातून संशयित आरोपीला बाहेर काढता आली नाही.
रविवार कारंजा येथील पंजाब नॅशनल बँक एटीएममध्ये कोणीतरी संशयित व्यक्ती असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या बिट मार्शलला जवळच असलेल्या सुरक्षा रक्षकांनी दिली होती.
संशयित आरोपीने जवळीलच मंदिरातील त्रिशूळ चोरून त्याच्या साहाय्यानं एटीएम फोडत असतानाच पोलिसांनी त्याला अटक केली. शहरातील मध्यवर्ती आणि रस्त्यालगत असलेले एटीएम फोडल्यानं नाशिक शहरात खळबळ उडाली आहे.