ममता बॅनर्जी हाजीर हो! न्यायालयाने बजावले समन्स

राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी मुंबई महानगर दंडाधिकाऱ्यांनी ममता बॅनर्जी यांना समन्स बजावले असून २ मार्च २०२२ रोजी न्यायालयासमोर उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

Updated: Feb 2, 2022, 06:00 PM IST
ममता बॅनर्जी हाजीर हो! न्यायालयाने बजावले समन्स title=

मुंबई : १ डिसेंबर २०२१ रोजी मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राष्ट्रगीताचा अवमान केल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. या तक्रारीवरुन मुंबई महानगर दंडाधिकाऱ्यांनी ममता बॅनर्जी यांना समन्स बजावले असून २ मार्च २०२२ रोजी न्यायालयासमोर उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

यशवंतराव प्रतिष्ठान येथे प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला ममता बॅनर्जी यांच्यासह माजी खासदार पवन वर्मा उपस्थित होते. तर, प्रेक्षकांमध्ये लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, खा. मजीद मेमन, शत्रुघ्न सिन्हा, सुधीन्द्र कुलकर्णी आदी उपस्थित होते. 

या कार्यक्रमाच्या अखेरीला राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताच्या सुरुवातीच्या दोन ओळी बसून म्हटल्या. नंतरच्या दोन ओळी उभे राहून म्हटल्यानंतर राष्ट्रगीत सुरू असतानाच त्या तिथून निघून गेल्या.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीता संबंधातील कायद्याचा भंग केला असून याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करणारा अर्ज भाजपचे सचिव विवेकानंद गुप्ता यांनी महानगर दंडाधिकाऱ्यांपूढे दाखल केला होता. या अर्जासोबत त्यांनी कार्यक्रमाची ध्वनिचित्रफित सादर केली होती. 

महानगर दंडाधिकाऱ्यांनी ही चित्रफित पाहून ममता बॅनर्जी यांना २ मार्च २०२२ रोजी न्यायालयापुढे उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. ममता बॅनर्जी या शासकीय कार्यक्रमासाठी उपस्थित नसल्यामुळे त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यास कसलीही परवानगी लागत नाही. त्यामुळे त्यांना न्यायालयापुढे हजर राहावे लागेल, असे महानगर दंडाधिकारी पी. आय. मोकाशी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.