सिंधुदुर्ग : सावित्री पूल दुर्घटनेनंतर राज्यभरातील धोकादायक पूल दुरुस्तीचे सत्र सुरू झाले. दोन भागांना जोडणारे रस्ते डागडुजीसाठी काढण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांचा खोळंबा होताना दिसतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग मालवण या भागांना जोडणारा मालवण कोळंब पूल दुरूस्त होण्याची मागणी देखील गेले काही महिने केली जात होती. शासन दरबारीही पत्रव्यवहार करुन याचा पाठपुरावा केला जात होता. हा पूल वाहतुकीसाठी चार महिने बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय.
पुलाच्या दुरूस्तीमुळे स्थानिक प्रवाशांचे हाल होणार आहेत. आधीच गेली वर्षभर या मार्गावरची एस टी वाहतूक बंद होती. त्यामुळे स्थानिकांना खासगी रिक्षाने प्रवास करावा लागत होता. आता या पुलावरून जाणारी रिक्षा मोटारसायकल वाहतूकही बंद होणार असल्याने प्रवाशाना १० किलोमीटरचा फेरा मारावा लागणार आहे.
सावित्री नदीवरील पूल कोसळल्यानंतर या पुलाच स्ट्रक्चरल ऑडिट झालं होत. यात हा पूल वाहतुकीस अयोग्य असलायचा दाखल देण्यात आला. त्यानंतर डिेसेंबर २०१७मध्ये पूलची दुरुस्ती सुरु झाली. सावित्री नदीवरचा पूल अवघ्या सहा महिन्यात तयार झाला मात्र कोळंब पुलाच्या नशिबी हे भाग्य नसल्याचेच समोर येत आहे. गेले वर्षभर या पुलाची साधी दुरुस्ती देखील होऊ शकली नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे.