अतिवृष्टीने मोठे नुकसान : शरद पवार करणार मराठवाड्याचा दौरा

अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पुरता शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.  

Updated: Oct 17, 2020, 10:57 AM IST
अतिवृष्टीने मोठे नुकसान : शरद पवार करणार मराठवाड्याचा दौरा  title=
संग्रहित छाया

मुंबई : अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पुरता शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्याची व्यथा जाणून घेण्यासाठी आणि शेतकऱ्याला आधार देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  मराठवाड्याचा दौरा करणार आहे. तुळजापूर, उमरगा, औसा, परांडा, उस्मानाबाद इथे पवार पाहणी करणार आहेत. उद्यापासून पवार दौऱ्यावर असणार आहेत. ते १८ आणि १९ ऑक्टोबर असा दोन दिवस दौरा करणार आहेत.

राज्यात कोकणसह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठा प्रमाणात परतीच्या पावसामुळे भातशेती आणि पिके तसेच बागायतदारांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे हातचे पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत.  

उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. बारामती शहरातील विविध भागांना त्यांनी भेट दिली. यावेळी अधिक काटेकोरपणे उपाययोजना राबवण्याबाबत अजित पवारांनी सरकारी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

दरम्यान, राज्यात काही दिवसांसाठी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे गाफील राहू नका. प्राणहानी होऊ नये यासाठी नागरिकांना विश्वासात घेऊन स्थलांतराचे काम करा, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला अतिवृष्टी आणि पूरस्थितीत सतर्क राहून काम करण्याचे निर्देश दिले. बाधितांना तातडीने मदत द्या तसेच झालेल्या नुकसानाचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनास दिल्या.

तर दुसरीकडे शेतकऱ्याला दिलासा देण्याची मागणी विरोधक वारंवार करत आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, राज्याच्या काही भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पुढील चार दिवसात पुन्हा पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.