महावितरणचा प्रताप; घरात वीजच नसणाऱ्या शेतकऱ्यांना पाठवले २० हजारांचे बिल

वीज मिळण्यासाठी आम्ही २०१६ ला कोटेशन भरलं. पण फक्त पोल उभे राहिले तारा आल्या नाही

Updated: Sep 4, 2020, 03:19 PM IST
महावितरणचा प्रताप; घरात वीजच नसणाऱ्या शेतकऱ्यांना पाठवले २० हजारांचे बिल title=

नितेश महाजन, झी मीडिया, जालना: महावितरण कंपनीचा जालना जिल्ह्यातील गलथान कारभार उघडकीस आला आहे. जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील वैद्य वडगाव येथील एक दोन नव्हे तर तब्बल ११ शेतकऱ्यांना महावितरण कंपनीने वीज जोडणी न देता थेट २०-२० हजारांची वीजबिलं दिल्याचं समोर आल्यानं शेतकरी संतप्त झालेत.

जालन्यातील वैद्य वडगावच्या ११ शेतकऱ्यांना महावितरण कंपनीच्या दडपशाही विरोधात डोके फोडून घेण्याची वेळ आलीय.२०१६ साली गावातील ११ शेतकऱ्यांनी शेतातील वीज पंपाला कनेक्शन मिळण्यासाठी महावितरणकडे पैसे भरले.शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याची प्रक्रिया सुरु झाली.सर्वच्या सर्व ११ शेतकऱ्यांच्या विहिरीपर्यंत पोल उभे राहिले.पण गेली ४ वर्ष झाली महावितरणकडून वीज जोडणी तर मिळाली नाहीच पण शेतकऱ्यांच्या हातात थेट २०-२० हजारांची बिलं ठेवण्यात आली.

वीज मिळण्यासाठी आम्ही २०१६ ला कोटेशन भरलं. पण फक्त पोल उभे राहिले तारा आल्या नाही, काही नाही आणि २०-२० हजारांचं आम्हांला बिल आलं. हे बिल आम्ही कोठून भरायचं, कोटेशन भरण्यासाठी आम्ही व्याजाने पैसे काढल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच अगोदर आमच्या शेतात पोल वगैरे नव्हते कोटेशन भरल्यानंतर तीन महिन्यात पोल उभे राहिले. चार वर्ष होऊनही पोलवर लाईन ओढली नाही आणि कोरोना काळात आमच्या हातावर विजबिलं टेकवले.आम्ही लाईन वापरलीच नाही तर विजबीलं भरायचे कसे?महावितरणने वीज जोडणी न देता थेट विजबीलंच शेतकऱ्यांच्या हातावर टेकवल्यानं हे शेतकरी संतप्त झालेत. यापैकी काहींनी आत्महत्या करण्याचा ईशारा दिलाय. जर महावितरणने वीज जोडणी दिली नाही.तर विजेचा वापर होईल कसा असा सवाल या शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय.

चार वर्ष झाली शेतात लाईट येण्यासाठी आम्ही व्याजाने पैसे काढून महावितरणला भरले.फक्त पोल उभे करून आम्हाला लाईन दिली नाही.हे बिल कसे भरायचे आहेत. वीज मिळाली नाही तर आम्ही जीव देऊ नाहीतर नाहीतर आत्महत्या करू, असा पवित्रा आता शेतकऱ्यांनी घेतला आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांना महावितरण कंपनीकडून विजबिलं देण्यात आली का याची खातरजमा करून दोषींवर कारवाई करू असं आश्वासन महावितरण अधिकाऱ्यांकडून देण्यात आलंय.महावितरण कंपनीकडे वीज कनेक्शन मिळण्यासाठी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी पैसे भरले आहेत.पण वर्षानुवर्षे प्रतीक्षा करून अजूनही या शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मिळाले नाही.दुसरीकडे शेतकऱ्यांच्या बांधावर पोल उभे राहून देखील कामं अर्धवट ठेऊन विजबिलं शेतकऱ्यांना देण्यात येतायत हा कोणता न्याय आहे असा प्रश्न आता उपस्थित होतोय.