इगतपुरी-कसारा अंतर १० मिनिटांत गाठा, समृद्धीवरील सर्वाधिक लांबीचा बोगदा तयार, वाचा वैशिष्ट्ये

Samruddhi Mahamarg Expressway update: समृद्धी महामार्ग आता आणखी सुस्साट होणार आहे. राज्यातील सर्वाधिक लांबीचा बोगदा समृद्धीच्या उतारावर होत आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 19, 2023, 02:57 PM IST
इगतपुरी-कसारा अंतर १० मिनिटांत गाठा, समृद्धीवरील सर्वाधिक लांबीचा बोगदा तयार, वाचा वैशिष्ट्ये title=
maharashtra Widest Twin Tunnel Ready On Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg Expressway

Samruddhi Mahamarg Expressway: समृद्धी महामार्गावरील सर्वात अव्हानात्मक टप्पा आज अखेर पूर्ण झाला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा मुंबई-नागपूरला जोडतो. यातील 600 किलोमीटरपर्यंतचा महामार्ग दोन टप्प्यात सुरू झाला आहे. तर, समृद्धीवरील मुंबई व नागपूर या मार्गावर असलेल्या 8 किलोमीटर लांबीचा दुहेरी बोगदा तयार झाला असून महाराष्ट्रातील सर्वाधिक रुंदीचा व लांबीचा असा एस आकाराचा दुहेरी बोगदा आहे. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत हा बोगदा तीन महिने आधी पूर्ण करण्यात आला आहे. यामुळं प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. 

समृद्धी महामार्गावरील इगतपुरी तालुक्यातील कळसूबाई मार्गाजवळील पिंपरी-सद्रोद्दिन व शहापूर तालुक्यातील वशाला बुद्रुक (कसारा) दरम्यानचा 13.1 किलोमीटरचा लांबीचा सहापदरी मार्ग बांधण्यात आला आहे. यात दोन पूल आणि दुहेरी बोगदा याचा समावेश आहे. या बोगद्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. या कंपनीने वेळेच्या तीन महिने आधीच पूर्ण करुन एमएसआरडीसीकडे देण्यात आला आहे. 

13.1 किमी लांबीच्या पॅकेजमधील 8,215 मीटर लांबीचा बोगदा तीन भागात तयार करण्यात आला आहे. इगतपुरीकडील (पिंपरी सद्रोद्दिन) बाजू ते वशाला बुद्रुककडील (कसारा) बाजू, यामध्ये तब्बल १८० मीटरचा उतार आहे. तेवढ्या उंचीवरून वाहन खाली येणार आहे. त्यामुळं हा बोगदा एस आकारात बांधण्यात आला आहे. 

 बोगदा एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगराला जोडण्यासाठी 20 मजली इमारतीच्या उंचीवर एक व्हायाडक्ट बांधण्यात आला आहे. यापैकी एक वायडक्ट 910 मीटर आणि 1,295 मीटर उंच आहे. बोगद्याच्या बांधकामादरम्यान देशात प्रथमच हाई प्रेशर वॉटर मिस्ट सिस्टम प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाअंतर्गत बोगद्यात आग लागल्यास किंवा तापमान 60 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यास अग्निशमन यंत्रणा आपोआप काम करू लागेल. प्रवासादरम्यान प्रवाशांना इंटरनेट सुविधा देण्यासाठी बोगद्याच्या आत लीकी केबलची व्यवस्था करण्यात आली आहे.

8 किमी लांबीचे ट्विन टनल एकमेकांना जोडण्यासाठी 26 पासिंग पॅसेज तयार करण्यात आले आहेत. त्याचबरोबर बोगद्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास 500 मीटर लांबीचा आपत्कालीन बोगदाही बांधण्यात आला आहे. या बोगद्यातून समृद्धी महामार्गावरून जुन्या मुंबई-नाशिक महामार्गावर जाता येणार आहे.

अंतर कमी होणार

नाशिक ते ठाणे दरम्यान अनेक डोंगर आहेत. पण या बोगद्यामुळं ठाण्यात 5 ते 7 मिनिटांत पोहोचता येणार आहे. तसंच, इगतपुरी-कसारादरम्यानचे अंतर १० मिनिटांत पूर्ण होणार आहे.