Weather Update : पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार; विदर्भाला मात्र अवकाळी झोडपणार

Maharashtra Weather Update : राज्याच्या हवामानात सध्या मोठे बदल होत असून, बंगालच्या उपसागरात सक्रिय असणाऱ्या मिचौंग चक्रीवादळामुळं यात भर पडत आहे.   

Updated: Dec 6, 2023, 09:05 AM IST
Weather Update : पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार; विदर्भाला मात्र अवकाळी झोडपणार  title=
Maharashtra Weather Update cyclone migjom impacts on rain prediction latest update

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या 'मिचौंग' चक्रीवादळानं आता पुढचा प्रवास सुरु केला असून, तामिळनाडूमध्ये धुमाकूळ घालणारं हे वादळ हळुहळू आंध्र प्रदेशच्या दिशेला सरकताना दित आहे. ज्यामुळं तामिळनाडू, आंध्र प्रदेशसह 17 राज्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. देशाच्या दक्षिण किनारपट्टीवर सध्या या वादळामुळं प्रचंड नुकसान झाल्याचं चित्र असतानाच महाराष्ट्रावरही त्याचे कमी-जास्त परिणाम मागील काही दिवसांपासून दिसून येत आहेत. 

चक्रीवादळाच्या धर्तीवर सध्या फक्त महाराष्ट्र नव्हे तर, देशभरात हवमानात मोठे बदल होत आहेत. कुठं पावसाच्या सरी कोसळत आहेत तर कुठं थंडीचा कडाका वाढत आहे. पुढील 24 तासांसाठी वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विदर्भ आणि मराठवाड्याच अवकाळीचा तडाखा बसू शकतो. विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळेल. पश्चिम महाराष्ट्राच्या सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर पट्ट्यामध्ये मात्र तापमानात मोठी घट नोंदवली जाऊ शकते. पुढील 72 तासांमध्ये राज्याच्या या भागात हिवाळ्याची पकड पाहायला मिळेल असाही अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील दोन दिवसांनंतर मात्र राज्यातील बहुतांशी हवामान कोरडंच राहण्याची शक्यता आहे. 

हेसुद्धा वाचा : राजकारण्यांचं 'च' 'भ' आता 'झ'... महाराष्ट्राच्या राजकारणात शिव्या झाल्या ओव्या

 

पुणे, सातारा भागांमध्ये सकाळच्या वेळी धुक्याची चादर पाहायला मिळेल. ज्यामुळं या भागांमध्ये दृश्यमानता कमीच असेल. दिवस माथ्यावर आल्यानंतर हवामान कोरडं होण्यास सुरुवात होईल आणि रात्रीच्या सुमारास तापमान पुन्हा मोठ्या फरकानं कमी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

वादळाची स्थिती काय? 

सध्या वादळाची तीव्रता कमी झाली असली तरीही पूर्व किनारपट्टी भागामध्ये पावसासाठी पूरक वातावरण निर्मिती होताना दित आहे. याचे परिणाम महाराष्ट्रापर्यंत दिसणार असून, इथं भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये ताशी 40 किमी वेगानं वारे वागून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आगे. या भागांना सध्या पावसाचा यलो अलर्ट देत नागरिकांनाही सतर्क करण्यात आलं आहे. 

हेसुद्धा वाचा : मुंबईच्या 'या' परिसरांमध्ये 7 डिसेंबरला पाणीपुरवठा बंद; तुम्हीही इथंच राहताय का? 

देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये पश्चिमी झंझावातामुळं हवामानात अनेक बदल दिसून येत आहेत. जम्मू, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशच्या काही मैदानी क्षेत्रांमध्ये पावसाची रिमझिम पाहायला मिळू शकते. मागील 24 तासांमध्ये काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी पडली, इथं पहलगाम भागात तापमान 5 अंशावर पोहोचलं तर, काश्मीरच्या खोऱ्यात हिमवृष्टीनं अनेक रस्ते बंद झाले. हिमाचलच्या पर्वतीय भागांमध्येसुद्धा हीच परिस्थिती आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तरेकडे थंडीचा कडाका दिवसागणिक वाढत जाऊन त्याचे परिणाम मध्य भारतापर्यंत दिसून येणार आहेत.