Maharashtra Weather Updates : उत्तरेकडील राज्यांमध्ये आता कुठे हिमवृष्टीची (snowfall) सुरुवात झालेली असतानाच आता महाराष्ट्रात मात्र या थंडीचा फारसा परिणाम होताना दिसत नाहीये. राज्याच सध्याच्या घडीला किमान तापमानात वाढ झाल्यामुळं थंडीनं आता राज्यातला मुक्काम उरकता घेण्यास सुरुवात केल्याचं चित्र अगदी स्पष्टपणे दिसत आहे. त्यातच राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सकाळच्या वेळे असणारा उकाडा दुपारपर्यंत अधिक तीव्र होत असल्यामुळं खरंच ही थंडी आता रामराम ठोकणार हीच परिस्थिती निर्माण झालेली दिसत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यातून थंडी काढता पाय घेत असतानाच काही पट्ट्यांमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसू शकतो. पश्चिमी झंझावाताचे परिणाम म्हणून राज्याच्या मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं आता या अवकाळीचं स्वरुप नेमकं कसं असणार असाच चिंतेत टाकणारा प्रश्न बळीराजाला पडू लागला आहे.
सध्याच्या घडीला मध्य प्रदेश, कर्नाटक, विदर्भ, मराठवाडा या भागांवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळं या भागांमध्ये पुढच्या 48 तासांत पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. तर, राज्याच्या बहुतांश भागांमध्ये लख्ख सूर्यप्रकाशासह किमान तापमान 10 अंशांहून अधिक राहणार आहे. तर, कमाल तापमानाचा आकडा 36 अंशांच्या घरात नोंदवला जाऊ शकतो.
सध्याच्या घडीला उत्तर पाकिस्तान आणि पंजाब प्रांतावर एक पश्चिमी झंझावात सक्रीय असून, त्याचं रुपांतर चक्रिवादळसदृश वाऱ्यांमध्ये होऊ शकतं. शिवाय उत्तर भारतावर सध्या जेट स्ट्रीम सुरु असून, याचे परिणाम देशातील हवामानावर दिसत आहेत.
गेल्या 24 तासांमध्ये हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशामध्या पावसासह हिमवृष्टी झाल्याचं पाहायला मिळालं. ज्यामुळं संपूर्ण उत्तर भारतामध्ये किमान तापमानात 3 ते 5 अंशांची घट नोंदवण्यात आली. पुढील 24 तासांसाठी देशाच्या उत्तर आणि उत्तर पूर्व राज्यांमध्ये बर्फवृष्टी होणार असून, तापमानावर याचे परिणाम पाहता येणार आहेत. तर, मेघालय, मणिपुरसह नागालँडमध्ये मात्र पावसाची हजेरी असणार आहे. पश्चिम बंगाल आणि गंगेच्या किनारपट्टी भागांवरही पावसाचं सावट असणार आहे.