Weather News : पाऊस, ऊन आणि थंडीचा लपंडाव सुरुच; कसं असेल राज्यातील हवामान? पाहा सविस्तर वृत्त

Weather News : राज्याच्या हवामानात सातत्यानं बदल सुरु असून, आता काही निवडक जिल्हे वगळले तर थंडी कुठच्या कुठं पळाली आहे हेच लक्षात येत आहे.   

सायली पाटील | Updated: Feb 16, 2024, 03:28 PM IST
Weather News : पाऊस, ऊन आणि थंडीचा लपंडाव सुरुच; कसं असेल राज्यातील हवामान? पाहा सविस्तर वृत्त  title=
Maharashtra Weather Today temprature rise and Konkan vidarbha marathwada news

Maharashtra Weather News : फेब्रुवारी महिन्याचा पहिला पंधरवडा ओलांडल्यानंतर आता राज्यातून थंडी कुठच्या कुठं दूर गेली असल्याचं स्पष्टपणे दिसू लागलं आहे. सध्याच्या घडीला राज्याच्या विदर्भ आणि मराठवाडा भागातून अवकाळीचं सावटही ओसरलं असून, या भागांमध्ये असणाऱ्या ढगाळ वातावरणानंही माघार घेतली आहे. थोडक्यात राज्यात आता उन्हाळ्याच्या दिवसांची सुरुवात झाली आहे. पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रामध्ये दुपारच्या वेळी उष्णतेचा दाह अधिक जाणवत आहे. राज्याच्या कमाल तापमानात होणारी वाढ पाहता फेब्रुवारीपासूनच यंदाच्य़ा उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे हे स्पष्टंय. 

हवामानात मोठे बदल 

हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या सक्रिय असणाऱ्या पश्चिमी झंझावातामुळं बरेच बदल दिसून येत आहेत. एक पश्चिमी झंझावात उत्तर पूर्व भारतावरून जात असून, दुसरा पश्चिमी झंझावात सौराष्ट्राहून जात आहे. परिणामी मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रावर त्याचे परिणाम दिसून येत आहे. या वाऱ्यांच्या प्रणालीमुळं सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थितीसुद्धा निर्माण झाली आहे. ज्यामुळं विदर्भ वगळता राज्यातील तापमान बहुतांशी कोरडं राहणार आहे. 

पुढील 24 तासांमध्ये विदर्भ वगळता राज्याच्या बहुतांश भागांमधील कमाल तापमानात वाढ होणार आहे. ज्यानंतर त्यापुढीस दिवसांसाठी तापमान स्थिर असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शुक्रवारपासूनच मुंबई आणि पुण्याचं तापमान वाढणार असल्यामुळं नागरिकांना उकाड्याचा सामना कराला लागणार आहे. तर, सातारा आणि सांगली भागामध्ये मात्र काही काळासाठी ढगांचं सावट पाहायला मिळू शकतं. शनिवार आणि रविवारी मात्र आकाश निरभ्र राहणार असून, उन्हाचे चटके जाणवू शकतात. 

हेसुद्धा वाचा : Mumbai News : गणेशोत्सवाच्या काही महिन्यांपूर्वीच प्रशासनाच्या महत्त्वाच्या सूचना; मंडळांनी पालन करा अन्यथा... 

देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्येसुद्धा आता किमान तापमान वाढत असून, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणामध्ये किमान तापमानाचा आकडा 7 अंशांवर असेल. तिथं जम्मू काश्मीर, हिमाचलमधील मनाली आणि स्पितीच्या खोऱ्यावर मात्र बर्फाची चादर पाहायला मिळणार आहे.